सुमारे ३५ दिवसांच्या पायी
प्रवासानंतर देहूत आगमन
देहू : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३७ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे ३५ दिवसांच्या प्रवासानंतर रविवारी (दि.२४ जुलै) दुपारी पावणे तीनच्या सुमारास तीर्थक्षेत्र देहूत आगमन झाले. देहूकर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे भक्तीमय आणि आनंदमयी वातावरणात मोठ्या उत्साहाने स्वागत केले.
श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सोहळ्यातील सहभागी विणेकरी, मानकरी, दिंडीकरी, सेवेकरी यांना श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. भाविकांचेही आभार मानण्यात आल्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता झाली.
पहाटे नित्यपूजेनंतर रविवारी (दि. २४ जुलै) पिंपरी गावातील श्री भैरवनाथ मंदिर येथून पालखी सोहळा वारकरी दिंडीकरी आणि भाविकांसह पुणे-मुंबई महामार्गावरून देहूगावाकडे मार्गस्थ झाला. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड लष्कर भागातून देहूरोड पालखी मार्गाने चिंचोली येथील शनी मंदिराजवळ आल्यानंतर अभंग आरती झाली. दरम्यान दुपारी चिंचोली येथील शनिमंदीर येथे संत तुकाराम अन्नदान मंडाळाच्या वतीने एकादशीनिमित्त वारकऱ्यांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. देहूतील मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे दुपारी पावणेतीनच्या सुमारास आगमन झाले. पालखीच्या स्वागताला वरूण राजानेदेखील हजेरी लावली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडून पालखीचे मोठ्या उत्साहाने भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी सुवासिनींनी वारी पूर्ण केलेल्या वारकऱ्यासंह पालखी रथाच्या बैलजोडीलाही औक्षण केले.
दरम्यान, सविता तुपे, रामचंद्र तुपे कुटुंबीयांकडून वेशीजवळ पालखीला दही भाताचे नैवद्य दाखविण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख ह. भ. प. संतोष महाराज मोरे, ह. भ. प. विशाल महाराज मोरे, ह. भ. प. माणिक महाराज मोरे, विश्वस्त ह. भ. प. संजय महाराज मोरे, ह. भ. प. भानुदास महाराज मोरे, ह. भ. प. अजित महाराज मोरे, संस्थानचे माजी अध्यक्ष, विश्वस्त, महाराजांचे वंशज, भाविक, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात पालखी रथ आल्यानंतर रथातून पालखी खांदेकऱ्यांनी खांद्यावर घेतली. पालखीतील पादुकांच्या दर्शनासाठी ग्रामस्थ, भाविकानी गर्दी केली होती. चौकाजवळील हनुमान मंदीरासमोर संतपर अभंग झाले. पालखी मार्गाने सोहळा मुख्य मंदिराकडे निघाली.
पालखीचे महाराजांच्या जन्मस्थळासमोर आल्यानंतर आरती झाली. पालखी सोहळा मुख्य मंदिरात आल्यावर चांदीची अब्दागिरी, गरूड टक्के, सावलीचे रेशमी छत्र यांच्यासह पालखी खांद्यावर घेऊन देऊळवाड्यात प्रदक्षिणा करण्यात आली. प्रदक्षिणेनंतर पालखी मंदिरातील भजनी मंडपात आल्यावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आरती झाली. आरतीनंतर उपस्थित वारकऱ्यांनी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’ नामाचा जयघोष करीत पताका उंचवून तुतारी, शंख, नगारा आणि ताशांच गजर केला. यावेळी मंदिराच्या परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. भजनी मंडपात पालखीचे सेवेकरी, मानकऱ्यांसह सर्व दिंडीचालकांना संस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांना एकादशीचा फराळ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.