![](https://dnyanbatukaram.com/wp-content/uploads/2022/07/समर्थ-रामदास.png)
समर्थ रामदास स्वामींनी
स्थापन केलेले ११ मारुती
युवकांमध्ये बलोपासना वाढीस लागावी म्हणून समर्थ रामदास स्वामींनी सातारा, कराड, कोल्हापूर परिसरात ११ मारुती स्थापन केले.
समर्थांच्या शिष्या वेणाबाई यांच्या रचनेत
या ११ मारुतींबद्दल उल्लेख आहे :
चाफळामाजीं दोन, उंब्रजेसी येक।
पारगांवीं देख चौथा तो हा॥
पांचवा मसूरी, शहापुरीं सहावा।
जाण तो सातवा शिराळ्यांत॥
सिंगणवाडीं आठवा, मनपाडळें नववा।
दहावा जाणावा माजगांवीं॥
बह्यांत अकरावा, येणें रीतीं गांवा।
सर्व मनोरथा पुरवील॥
वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास।
कीर्ती गगनांत न समावे॥
आजच्या हनुमान जन्मोत्सवानिमित्त या मारुतींबद्दलची ही माहिती –
चाफळचा दास आणि वीर मारुती
चाफळमधील या दोन मारुतींची स्थापना रामदासांनी १५७० मध्ये केल्याची नोंद आहे. दास मारुतीची मूर्ती श्रीराम मंदिराच्या पुढे आहे. वीर मारुतीची मूर्ती मंदिराच्या मागील बाजूस आहे. सातारा कराड चिपळूणकडून जाणाऱ्या फाट्याजवळ उंब्रज गावाजवळ चाफळ येथे या मूर्ती पाहायला मिळतात. देवळाच्या मागे असलेली प्रताप मारुतीची मूर्ती कृष्ण नदीच्या काठावर चुना, वाळू, ताग यांपासून बनवलेली आहे. मंदिरासमोरील सहा फुटांची दास मारुतीची उंच मूर्ती श्रीरामाच्या समोर हात जोडून उभी असून, या मूर्तीचे नेत्र श्रीरामाच्या चरणांवर स्थिर झाल्याचे जाणवते. मारुतीची ही मूर्ती भीमरूपी स्तोत्रामध्ये वर्णन केल्यासारखीच आहे. कमरेला सोन्याची कासोटी, किणकिणाऱ्या घंटा, नेटक्या, सडपातळ मूर्तीच्या डोळ्यातून अग्निवर्षाव होत असल्याचा भास होतो. या मूर्तीच्या पायाखाली दैत्य आहे.
१९६७ मध्ये कोयनेच्या भूकंपात राममंदिराचे नुकसान झाले. परंतु या मारुती मंदिराला काहीही हानी पोचली नाही, असे सांगितले जाते.
माजगावचा मारुती
चाफळपासून तीन किलोमीटरवरच्या एका गावात पाषाणाच्या रुपात असलेल्या दगडाला समर्थांनी मारुतीचे रुप दिले. ही मारुतीची पाच फुटी मूर्ती चाफळच्या राम मंदिराकडे तोंड करून उभी आहे. आधीच्या कौलारू, माती विटाच्या देवळाचा जीर्णोद्धार करून त्याला आता नवे रूप देण्यात आले आहे. पाच फूट उंचीची मारुतीची मूर्ती पश्चिम दिशेला चाफळच्या राममंदिराकडे तोंड करून उभी आहे. मंदिराच्या एका भिंतीवर द्रोणागिरी पर्वत घेऊन जाणाऱ्या हनुमंताचे चित्र आहे. चाफळच्या श्रीराम देवस्थानकडेच या मंदिराचे व्यवस्थापन आहे.
शिंगणवाडीचा मारुती
या मारुतीला खडीचा मारुती, बालमारुती, चाफळचा तिसरा मारुती असे देखील म्हणतात. शिंगणवाडीची टेकडी चाफळपासून एक किलोमीटरवर आहे. येथे जवळच समर्थांची ध्यान करण्याची जागा असलेली रामघळ आहे. येथे समर्थानी मारुतीची छोटीशी सुबक मूर्ती स्थापना केली. चार फूट उंचीची उत्तरेकडे तोंड केलेल्या या मूर्तीच्या डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू दिसते. सर्व ११ मारुतींच्या देवळांमध्ये हे सर्वात लहान देऊळ आहे. चाफळच्या आधी समर्थांचा मठ इथेच शिंगणवाडीला होता. आजूबाजूच्या परिसरात घनदाट झाडे आहे. या देवळाचा कळस तांबड्या रंगाने रंगविला आहे.
उंब्रजचा मारुती
चाफळचे दोन आणि माजगावातील मारुतीचे दर्शन करून परत उंब्रजला आल्यावर इथे जवळच तीन मारुती आहेत. त्यातील हा एक उंब्रजच्या मठातील मारुती. याविषयी अशी आख्यायिका आहे, की समर्थ चाफळवरून उंब्रजला दररोज स्नानासाठी येत असत. एकदा नदीत बुडताना त्यांना स्वत: हनुमंतानेच वाचविले होते, असे सांगतात. समर्थांना उंब्रजमधील काही जमीन बक्षीस म्हणून मिळाली होती. तिथे त्यांनी मंदिर बांधून त्यात चुना, वाळू आणि तागापासून मारुतीची मूर्ती बनवून तिची स्थापना केली. या मूर्तीच्या पायाखाली दैत्य दिसतो. मूर्तीच्या स्थापनेनंतर १४ दिवस इथे रामदास स्वामींनी कीर्तन गेले, असे सांगितले जाते.
मसूरचा मारुती
उंब्रजपासून १० किलोमीटरवरील मसूर येथे समर्थांनी मारुतीची स्थापना केली. पाच फुटांची चुन्यापासून बनवलेली ही पूर्वाभिमुखी मूर्ती अतिशय सौम्य, प्रसन्न आहे. मूर्तीच्या मस्तकी मुकुट, गळ्यात माळ, जानवे, कमरेला मेखला, पायाखाली जंबुमाळी नावाचा राक्षस दिसतो. मूर्तीच्या एका बाजूला शिवराम तर दुसऱ्या बाजूला समर्थांचे चित्र काढलेले आहे. सहा दगडी खांबांवर या देवळाचे छत तोलून धरलेले आहे. या देवळाचा सभामंडप १३ फूट लांबी रुंदीचा आहे. पायाखाली जंबुमाळी नावाचा राक्षस दाबून धरलेला दिसतो.
शिराळ्याचा मारुती
सांगली जिल्ह्यात नागांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळे गावात एसटी बस स्थानकाजवळच समर्थांनी स्थापन केलेल्या मारुतीचे मंदिर आहे. या सुंदर मंदिरात मारुतीची सात फुटी भव्य मूर्ती आहे. ही मूर्ती पूर्णपणे चुन्याने बनवलेली आहे. या उत्तराभिमुख मूर्तीला कटिवस्त्र आहे. त्यात सुंदर गोंडा असून कंबरपट्ट्यामध्ये घंटा बसविण्यात आला आहे. मूर्तीच्या डोक्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूस झरोके आहेत. ज्यामधून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मूर्तीच्या तोंडावर प्रकाश पडतो. देवळाच्या प्राकाराला दक्षिण दिशेस दार आहे.
शहापूरचा मारुती
कराडपासून १५ किलोमीटरवर हे मारुतीचे देऊळ आहे. समर्थांनी ११ मारुतींमध्ये सर्वात अगोदर या मारुतीची स्थापना केली. या मारुतीला चुन्याचा मारुती असे देखील म्हटले जाते. गावाच्या एका टोकावर नदीच्या काठाला हे मारुतीचे देऊळ आहे. देऊळ आणि मारुतीची मूर्ती दोन्ही पूर्वाभिमुखी आहे. सात फुटांची ही मूर्ती काहीशी उग्र दिसते. या मूर्तीच्या पुढे पितळी उत्सव मूर्ती आहे. मारुतीच्या मूर्तीच्या मस्तकावर गोंड्यांची टोपी आहे. येथून जवळच रांजणखिंड आहे. येथून दोन दगडी रांजण दिसतात. जवळच्या टेकडीवर समर्थांचे वास्तव्य असे.
बहे बोरगावचा मारुती
सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात बहे किंवा बाहे गाव आहे. कराड-कोल्हापूर रस्त्यावर असलेल्या पेठवरून साधारण १२ किलोमीटरवर हे ठिकाण आहे. या ठिकाणी मारुतीरायाचे दर्शन घडेल, अशा आशेने गेलेल्या समर्थांना मारुतीने मूर्तीरूपात दर्शन दिले नाही. त्यामुळे समर्थानी मारुतीरायाचा धावा सुरू केला. त्यांना त्यावेळी पाठीमागे डोहातून त्यांना हाका ऐकू आल्या. समर्थांनी डोहात बुडी मारून तिथून मारुतीची मूर्ती बाहेर काढली आणि त्याची स्थापना या ठिकाणी केली, असे सांगितले जाते. १६५२ मध्ये प्राचीन काळी इथे राममंदिर होते. त्याच्या पुढ्यात शिवलिंग. या राममंदिराच्या पाठीमागे मारुतीची स्थापना केलेली आहे.
मनपाडळेचा मारुती
मनपाडळे आणि पारगाव कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड, जोतिबाच्या परिसरात आहे. कोल्हापूर ते वडगाव वाठारपासून पुढे १४ किलोमीटरवर हे मनपाडळे आहे. ११ मारुतींपैकी सर्वात दक्षिणे दिशेस असलेल्या या मारुतीची स्थापना समर्थांनी केली. पाच फूट उंच असलेली ही साधी सुबक मूर्ती आणि देऊळ उत्तराभिमुखी आहे. ओढ्याकाठी सुंदरसे कौलारू देऊळ आहे. गाभारा औरसचौरस आहे. येथील सभामंडपाचे नव्याने बांधकाम केले आहे.
पारगावचा मारुती
यालाच बाळमारुती किंवा समर्थांच्या झोळीतला मारुती असे म्हणतात. कराड-कोल्हापूर रस्त्यावर वाठार गावाजवळ नव्या पारगावाजवळ जुने पारगाव आहे. या गावात ही मारुतीची मूर्ती आहे. ११ मारुतींपैकी शेवटची आणि सर्वात लहान अशी ही मूर्ती सपाट दगडावर कोरलेली दीड फुटांची आहे. मूर्तीला शेंदूर नसून केसांची शेंडी बांधलेली दिसते. मारुतीराया जणू डावीकडे धावत निघाल्याच्या आविर्भावात ही मूर्ती कोरलेली आहे. मनपाडळे ते पारगाव अंतर पाच किलोमीटरचे आहे.