चैतन्य महाराजांची पालखी
सुरू करणारे वै. सहादुबाबा
संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांचा वारसा पुढे नेणारे अनेक सत्पुरुष पुणे जिल्ह्यात होऊन गेले. त्यापैकी एक म्हणजे, जुन्नर तालुक्यातील ह. भ. प. सहादुबाबा वायकर. जुन्नर परिसरात संतांचे विचार जागते ठेवणाऱ्या सहादुबाबांची आज पुण्यतिथी. १८६३ ते १९६८ हा बाबांचा कालखंड होता.
व्यापार सोडून वारकरी विचारांचा प्रसार
आज जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावात अखंड हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, पारायण ज्यांच्या प्रेरणेने सुरू झालेले आहे, त्या वायकरबाबांचा जन्म तालुक्यातील आर्वीजवळच्या गुंजाळवाडी येथे झाला. त्यांचे वडील भाऊ उमाजी वायकर हे मुंबई येथे कोळशाचा व्यवसाय करणारे सुप्रसिद्ध व्यापारी होते. त्यामुळे घराला प्रतिष्ठेबरोबरच सधनताही लाभलेली होती. बाबांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. १८६८-७६ या कालावधीत मराठी सातवीनंतर बाबांचे इंग्रजी चौथीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर बाबा वडिलांना व्यवसायात मदत करू लागले. त्यावेळी त्यांचा व्यवसाय तेजीत होता. त्यामुळे त्यांनी आपल्या तालुक्यातील अनेकांना रोजगार दिला. परंतु बाबांच्या वडिलांचा अकाली स्वर्गवास झाला. लहान वयातच सहादुबाबांचे पितृछत्र हरपले. कुटुंब विभक्त झाल्यानंतर व्यवसायाच्या व्यापावर बाबांनी कायमचे पाणी सोडले. मुंबईतील प्रारंभिक जीवन संपवून आपला संसार घेऊन बाबा आणि भाऊ रखमा वायकर कायमचे गुंजाळवाडीचे रहिवाशी झाले. आणि पुढचे जीवन वारकरी विचारांच्या प्रसारासाठी व्यतित करण्याचे त्यांनी ठरविले.
शेतकरी आणि वारकरी जीवनाची सांगड
संत तुकोबारायांच्या उपदेशाप्रमाणे बाबांचे शेतकरी-वारकरी जीवन सुरू झाले. वयाच्या २२व्या वर्षी बाबांनी पहिली आषाढी वारी केली. पत्नी भिकुबाई, पाच मुलगे, दोन मुली असा परमार्थ आणि प्रपंचाचा समन्वय साधत बाबा भजन, कीर्तनात रममाण झाले. बाबांचे सासरे बाळाजी शिंदे यांनी स्वतःला मूलबाळ नसल्याने आपली सर्व संपत्ती बाबांच्या गैरहजेरीत मुलगी भिकुबाई यांच्या नावे बक्षीसपत्र केली. बाबा घरी आल्यानंतर त्यांना हा वृत्तांत समजला. त्यांनी सासरे शिंदे यांना बोलावून, ‘ही तुमची इस्टेट तुम्ही परत घ्या, आम्हाला ती नको’, असे सांगून टाकले. त्यानंतर हे बक्षीसपत्र रद्द केले गेले. त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव सितारामदादा यांनीही त्यांना अशाच प्रकारे मिळालेली मालमत्ता नाकारली.
कथा, कीर्तनातून व्यसनमुक्ती
शेतकऱ्याचा साधा पोषाख, प्रेमळ आणि नम्र वागणूक, लोकांबद्दल जिव्हाळा, स्वच्छ व्यवहार आणि भगवंताच्या भक्तीत रंगलेले अंत:करण असे बाबांचे सोज्वळ स्वरूप होते. कधी पायी चालत, कधी सायकलवरून किंवा बैलगाडीने फिरून बाबा गावोगावी विनामोबदला कथा-कीर्तनातून प्रबोधन करत. त्यांच्या प्रबोधन कार्यातून गावेच्या गावे व्यसनमुक्त झाली. ग्रामदेवतांना बळी देण्याच्या प्रथेतील हिंसा बाबांच्या सांगण्यामुळे बंद केली गेली. सात्विक जीवनाचा आदर्श बाबांनी लोकांसमोर ठेवला. जुन्नर-आंबेगाव परिसरातील शेतकरी आणि त्यांनी कामधंद्याच्या निमित्ताने मुंबईत केलेल्या वस्त्या हे बाबांचे कार्यक्षेत्र होते. सहादुबाबांनी आपले कार्यक्षेत्र संत विचारांनी, भजन, कीर्तनांनी सतत वाजते, गाजते ठेवले. दिंड्या, पालख्या, हरिनाम सप्ताह, ग्रंथ पारायणांचे उपक्रम राबवून संस्कार घडविणारी यंत्रणा उभी केली. बाबांचे गुरुबंधू, सहकारी आणि अनुयायांनी जुन्नर, आंबेगाव परिसरातील अनेक गावेवारकरी विचारांनी भारून टाकली.
जवळपास ६०-६५ वर्षे बाबा माऊलींबरोबर चाकणकरांच्या दिंडीत पंढरपुरला जायचे. कित्येक वर्षे चाकणकरांच्या दिंडीचे नेतृत्व सहादुबाबांच्या खांद्यावर होते. संत सहादुबाबा वायकर यांची वारकरी नित्यनेमाची भजनी मालिका महिन्याचे वारकरी, दिंडीवाले, फडकरी यांच्या सर्वतोमुखी गाजली, लोकप्रिय झाली. मामासाहेब दांडेकर, धुंडामहाराज देगलूरकर, शंकरमहाराज खंदारकर या महाराष्ट्रातील विख्यात विद्वानांनी संत सहादुबाबांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. सहादूबाबांनी जुन्नर तालुक्यातील ओतूरवरून पंढरपूरला जाणारी चैतन्य महाराजांची पालखी सुरू केली. चैतन्य महाराज हे संत तुकाराम महाराजांचे गुरू होत. त्यांनी ओतूर या गावी मांडवी नदीकाठी तुकाराम महाराजांना अनुग्रह दिल्याची कथा वारकरी संप्रदायात प्रचलित आहे.
‘वारी आणि बारी’चा समन्वय
केवळ टाळ आणि माळ एवढ्याच भक्तीकार्यात बाबांची वाटचाल चाललेली नव्हती, तर त्यात सामाजिक जीवनाची उभारणी व्हावी यासाठी त्यांचे जीवन खर्ची पडले. अनेक लोककलाकारांना आणि तमाशा कलावंताना बाबांनी वारकरी संप्रदायात सामावून घेतले. त्याना विठ्ठलभक्तीचा कानमंत्र दिला. त्यांना सोबत घेऊन पंढरपूरच्या वाऱ्या केल्या. पांडुरंगाचे दर्शन घडवले. याचाच परिणाम म्हणून ‘वारी’ आणि ‘बारी’ एकत्र नांदू लागली. याचे आदर्श उदाहरण म्हणजे, राष्ट्रपती पदक विजेते सुप्रसिद्ध तमासगीर भाऊ बापू नारायणगांवकर हे बाबांचे अनुयायी झाले. ते नित्यनेमाने देहूची वारी करत. आजही भाऊ बापूंची समाधी पंढरपुरात उभी असल्याचा उल्लेख आढळतो. आजही ‘वारी आणि बारी’ यांचा समन्वय जुन्नर परिसरात नांदत आहे.
बाबांनी चार वेळा अनेक अनुयायांसह चारधाम यात्रा केली. दिव्याने दिवा लावतात तसे सहादुबाबांनी अनेकांच्या हृदयात भक्ती-ज्ञानाची ज्योत लाविली. ह. भ. प. रामदासबाबा मनसुख आणि ह. भ. प. कोंडाजीबाबा डेरे यांना सहादुबाबांच्या बाबांच्या कार्याने प्रेरणा लाभली. ह. भ. प. रामकृष्णबुवा जाधव, सुमंतबुवा नलावडे, भिकाजीबुवा बच्चे, भिकाजीबुवा काशिद, गंगारामबुवा घोलप, शंकरबुवा बोडके, घाटपांडे गुरूजी, मारूतीबुवा चव्हाण, मुरलीधरबुवा वाईकर, पुंडलिकबुवा खांडगे, आत्मारामबुवा घुले, आत्मारामशास्त्री बोरकर, सुदामबुवा वाईकर, विष्णुबुवा गबाले, चंद्रकांतबुवा पटाडे, बजरंगबुवा आंधळे या अनुयायांनी सहादुबाबांचा वारसा समर्थपणे सांभाळला. वै. ह. भ. प. सुमंतमहाराज नलावडे यांनी पंढरपुरातील मठात बाबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून गुरू-शिष्य नाते जपले आहे.
गुंजाळवाडी येथे स्मृती
गुंजाळवाडी येथे सहादूबाबा आणि त्यांच्या कुटुंबाने श्रीराम पंचायतन मंदिर उभारले आहे. मंदिरात वापरलेले मार्बल त्या काळी जपानवरून आणल्याचे सांगतात. याठिकाणी सहादूबाबा वायकरांची समाधी आहे. मुंबईमधील ‘भाऊचा धक्का’ सहादूबाबांचे वडील भाऊ वायकर यांच्या मालकीचा होता, असे ग्रामस्थ सांगतात. दर १२ वर्षांनी नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यातील साधूंची झुंड तीन दिवस या मंदिरात थांबत असते. सहादुबाबांनी स्वहस्ते लिहिलेली संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा याठिकाणी पाहावयास मिळते. सहादुबाबांनी दिलेला वारकरी विचारांचा वारसा जुन्नकर भक्तिभाव आणि निष्ठेने पुढे नेत आहेत. बाबांच्या थोर कार्याला त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!
(लेखन संदर्भ : संजय वसंतराव नलावडे आणि रमेश खरमाळे)