संत चोखा मेळा यांची
मानली जाणारी चैत्री वारी
आज कामदा एकादशी अर्थात पंढरीच्या श्री विठुरायाच्या चैत्री वारीचा मुख्य दिवस. पंढरपूरच्या आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या चार वाऱ्यांपैकी चैत्री वारी ही टाळी वाजवावी गुढी उभारावी। वाट हे चालावी पंढरीची।। असे सांगणाऱ्या संत चोखामेळा यांची असते, असे वारकरी मानतात.
संत चोखामेळा आपल्या सर्व कुटुंबासह जवळच्या मंगळवेढ्याहून चैत्री वारीला पंढरपूरला येत. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात शेतीच्या कामांना विश्रांती आणि मुलांच्या वार्षिक परीक्षा वगैरे संपल्याने सोलापूर, पुणे जिल्ह्याच्या आसपासचे लोक या यात्रेला सहकुटुंब येतात.
आषाढी, कार्तिकी महिन्यांतील यात्रा मोठ्या असतात. पैकी आषाढीला आंध्रप्रदेश, कोकणातले वारकरी येतात. कार्तिकी यात्रेला मराठवाडा, विदर्भातील वारकऱ्यांची संख्या जास्त असते. माघी वारीला सांगली, सातारा भागातील वारकऱ्यांची गर्दी होते. म्हणजे हवामान, भौगोलिक रचना आणि पिकांच्या नियोजनानुसार शेतकरी या वाऱ्यांना येतात.
चैत्री वारीत ‘चंदन उटी’ला महत्त्व
गुढीपाडवा ते मृग नक्षत्र या कालावधीत श्री विठ्ठल रखुमाईची चंदन उटी पूजा सुरू असते. उन्हाळ्यातील उष्म्यात देवाला थंडावा देण्यासाठी ही पूजा केली जाते. एका दगडी सहाणेवर तीनेक तास चंदनाचे लाकूड उगाळण्यात येते. त्यातून तयार झालेला सुमारे साडेसातशे ग्रॅम चंदनाचा चंदनाचा शीतल लेप पोषाखातील अंगीऐवजी ‘उटी’ म्हणून देवाच्या मूर्तीला लावण्यात येतो. अलिकडेच चंदन उगळण्यासाठी जळगावाहून मशीन आणण्यात आले आहे. त्यामुळे चंदन उगाळणाऱ्या १० कर्मचाऱ्यांचे कष्ट कमी झाले आहेत. या विधीसाठी म्हैसूर येथील कर्नाटक सरकारच्या चंदन विक्री केंद्रातून उत्तम दर्जाची चंदनाची खोडे आणली जातात. भाविक स्वत: चंदन उटीचा खर्च करून ‘चंदन उटी’ पूजा करतात. वारीच्या दिवशी दुपारी तीन वाजल्यानंतर सुरू झालेली ही पूजा तासभर चालते. या पूजेनंतर विठुरायास शिरा, फळांचा नैवेद्य दाखवला जातो. मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर, हवेत गारवा निर्माण झाल्यावर एका मुहूर्तावर चंदन उटीचा विधी बंद केला जातो.
मोठ्या देवाची, ऐक्याची, पळती यात्रा
पंढरपूरच्या या यात्रेला मोठ्या देवाची म्हणजे महादेवाची, पळती म्हणजे धावपळीची आणि हरिहर ऐक्याची यात्रा म्हणतात. कारण याच दिवशी शिखर शिंगणापूरच्या महादेवाची यात्रा असते. वारकरी विठ्ठल आणि महादेव यांच्यात दुजाभाव करत नाहीत. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा स्नान आणि पांडुरंगाचे दर्शन झाले, की शिखर शिंगणापूरच्या यात्रेला जातात. ही यात्रा शिव-पार्वतीच्या विवाहाची यात्रा असते. या विवाहाला साक्षात विठुराया गेला आणि त्याने पंचपक्वानांचे भोजन केले, अशी आख्यायिका वारकरी सांगतात. त्यामुळेच चैत्र शुद्ध एकादशीला उपवास असूनही विठुरायाला दुपारी पुरणपोळीचा महानैवेद्य दाखविण्यात येतो. विशेष म्हणजे देवाला सकाळी उपवासाची खिचडी आणि संध्याकाळीही उपवासाची भगर यांचा नैवेद्य असतो. मात्र दुपारच्या भोजनात हा पुरणपोळीचा महानैवेद्य देण्याची शेकडो वर्षाची परंपरा आजही पाळली जाते.
कामदा एकादशीचे महत्त्व
चैत्र शुद्ध एकादशीला कामदा म्हणजेच मनोकामना पूर्ण करणारी एकादशी. मनोकामना अर्थात प्रापंचिक इच्छा या सतत वाढतच जाणाऱ्या असतात. त्या पूर्ण होत जातात, तशी मनुष्याची अभिलाषा अजून वाढत जाते. यातून व्यक्ती समाधान गमावून बसतो. तर दुसऱ्या प्रकारची इच्छा पारमार्थिक असते. ती पूर्ण झाली, की माणूस व्यक्ती समाधानी होतो, निरिच्छ होतो. पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन झाल्यानंतर वारकरी असाच निरिच्छ होतो. अर्थात पारमार्थिक सुख मिळाल्याने भरून पावतो. कामदा एकादशीचे हेच महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे या कामदा एकादशीला ‘जो जे वांछिल’ ते त्याला मिळो. विठुरायाच्या केवळ मुखदर्शनाने मनाचा गाभारा समाधानाने भरून जावो, याच ।।ज्ञानबातुकाराम।। परिवारातर्फे सर्वांना शुभेच्छा आणि विठुरखुमाईच्या चरणी त्रिवार वंदन!🙏