अहिंसा, भूतदयेचा संदेश
देणारे भगवान महावीर
जैन धर्मातील २४ तीर्थंकरांपैकी अखेरचे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती. महावीरांच्या आधी जैन धर्माचे २३ तीर्थंकर होऊन गेले, असे जैन धर्माचे अनुयायी मानतात. जैन धर्माला प्रभावशाली बनविण्याचे फार मोठे श्रेय महावीरांकडे जाते.
इसवीसन पूर्व सहावे शतक हे सांस्कृतिक दृष्ट्या उलथापालथीचे शतक होते. या शतकात मगध देशातील (सध्याच्या दक्षिण बिहारमधील) वैशाली नगरीचे उपनगर असलेल्या कुंडग्रामात वा कौंडिण्यपुरात महावीरांचा जन्म झाला. त्यांचे वडील सिद्धार्थ हे या उपनगराचे प्रमुख होते. त्यांची आई त्रिशला ही वैशालीच्या लिच्छविवंशीय राजाची मुलगी होती. विदेहदिन्ना आणि प्रियकारिणी या नावांनी ही ती ओळखली जात असे. महावीर गर्भावस्थेत असताना त्यांना देवानंदा नावाच्या ब्राह्मणीच्या उदरातून त्रिशला या क्षत्रिय राणीच्या उदरात आणण्यात आले होते, अशी एक पुराणकथा आहे.
लहानपणापासून वैराग्यशीलता
महावीरांची प्रवृत्ती लहानपणापासूनच चिंतनशील व वैराग्यशील होती. परंतु तुम्ही हयात असेपर्यंत गृहत्याग करणार नाही, असे वचन त्यांनी आईवडिलांना दिले होते. आईवडिलांच्या मृत्यूनंतरही नंदिवर्धन या थोरल्या भावाच्या विनंतीवरून ते काही काळ घरी थांबले आणि वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. दिगंबर पंथातील अनुयायांच्या मते ते आयुष्यभर अविवाहित होते, तर श्वेतांबर पंथातील अनुयायांच्या मते ते विवाहित होते. यशोदा असे त्यांच्या पत्नीचे नाव होते आणि त्यांना अनुजा नावाची मुलगी होती. आईवडिलांनी वर्धमान असे त्यांचे नाव ठेवले होते परंतु ते ‘महावीर’ या नावानेच विख्यात झाले. आपण ज्याचा आधार घेतला आहे, त्या वटवृक्षाला वेढून टाकणाऱ्या सर्पाला ठार मारण्याऐवजी त्याच्या ठिकाणचे हिंसकत्व नष्ट केल्यामुळे त्यांना ‘महावीर’ हे नाव मिळाले, अशी कथा आढळते. राजवैभव सोडून महावीरांनी गृहत्याग केला. नंतरची १२ वर्षे त्यांनी खडतर तप केले. प्रारंभीच्या एका वर्षानंतर त्यांनी वस्त्राचाही त्याग केला. दंश करणाऱ्या कीटकांचीही त्यांनी हत्या केली नाही. अज्ञानी लोकांनी या काळात त्यांचा खूप छळ केला पण त्यांनी तो शांतपणे सोसला. अखेरीस वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर मृत्यूपर्यंत म्हणजेच पुढची ३० वर्षे ते धर्मोपदेश करीत राहिले.
जगा आणि जगू द्या
भूतदया हे महावीरांच्या जैन धर्माचे मुख्य तत्व आहे. ‘जगा आणि जगू द्या’ हा महान सिध्दांत महावीरांनी सांगितला आणि विश्वात अहिंसेचा प्रसार केला. भगवान महावीरांनी वेद, कर्मकांड, यज्ञामध्ये होणारी पशूंची हत्या यांचा तीव्र विरोध केला. अहिसेंच्या तत्त्वाला महावीरांनी विशेष महत्त्व दिले. निसर्गातील प्रत्येक जीव महत्त्वाचा असून निसर्गाचा आदर करा, अशी शिकवण भगवान महावीर यांनी दिलेली आहे. सत्य हे स्वत:च शोधावे त्यासाठी सुरुवातही स्वत:पासून करावी. स्वत:वर विजय मिळवित शरण जायचे तेही स्वत:लाच. प्रत्येक व्यक्तीला महावीर होण्याचा अधिकार आहे, असे भगवान महावीर मानत असत. अहिंसेचे पालन करणाऱ्या सर्व लोकांना मी जैनच समजतो, असे महात्मा गांधी म्हणत असत.
माणुसकीचा विचार
भगवान महावीरांचे विचार, शिकवण कोणत्या एका विशिष्ट जातीसाठी किंवा धर्मासाठी नसून ते साऱ्या विश्वाला अहिंसेचा, शांतीचा, संयमाचा आणि माणुसकीचा विचार देणारे होते. विश्वात कणाकणामध्ये जीवाचे अस्तित्व आहे, हे मान्य करून कोणासही कोणत्याही प्रकारचे दुःख होईल अशी कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये, अशी जीवन पध्दती जगावी असा उपदेश वैशालीचे महापुत्र महावीरांनी दिला. निसर्गातील प्रत्येक सूक्ष्म जीवाला जगण्याचा अधिकार निसर्गाने दिला आहे. त्यामुळे मानवाने कोणत्याही सूक्ष्म जीवाला त्रास होईल असे वर्तन करू नये, निसर्गाचा आदर करावा अशी शिकवण भगवान महावीरांनी दिली. निसर्गाचे लचके तोड करण्याचे परिणाम मानव आज भोगत आहे. पैशाला सर्वस्व मानून मानवतेपासून दूर जाणाऱ्या आजच्या पिढीला भगवान महावीर स्वामी यांचे विचार आज अहिंसा आणि शांतीमय जीवन जगण्यास पथदर्शक ठरतील हे नक्की.
– अंजली कटारिया