आपल्या कामामध्येच ईश्वर

शोधणारे संत सावता माळी

संत श्री सावता माळी महाराज हे आपल्या थोर संत परंपरेतील आणखी एक महान संत. ‘कर्तव्य आणि कर्म करत राहणे, हीच खरी ईश्वरसेवा’ अशी शिकवण सावता माळी महाराजांनी १३ व्या शतकात आपल्याला दिली. वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे.

भेटायला येतात खुद्द पांडुरंग
श्री विठ्ठल हेच परमदैवत असलेले सावता माळी कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते. म्हणजेच कामातच ईश्वराला पाहत असत. ‘कर्मे ईशु भजावा’ हीच त्यांची वृत्ती होती. आपल्या सर्व संतांच्या पालख्या-पादुका विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. पण, आपल्या भक्‍ताला भेटण्यासाठी पांडुरंगाची पालखी पंढरपूरहून वर्षातून एकदा सावता माळी महाराज यांच्या गावाला म्हणजे अरणभेंडी येथे जाते. यावरूनच सावता महाराज यांच्या भक्‍तीने विठ्ठलालाही गोडी लावली, याची प्रचिती येते.

माढा तालुक्यातील अरण हे जन्मगाव
संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांचे समकालीन असलेले संत सावता माळी यांचा जन्म १२५० मध्ये महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्‍यातील अरण येथे झाला. त्यांचे घराणे मूळचे सांगली जिल्ह्यातील मिरज संस्थानातील औसे होय. संत सावता महाराजांचे आजोबा देवू माळी हे अरण या गावी स्थायिक झाले. नंगीताबाई आणि पुरसोबा हे सावतोबांचे आई आणि वडील. दोघेही विठ्ठल भक्त होते. त्यामुळे लहानपणापासूनच सावतोबांनीही भक्तीचे धडे गिरविले होते. ते विठ्ठलाचे परमभक्त होते. शेती हा त्यांचा व्यवसाय होता. हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. सावतोबांनी आपल्या आई वडिलांची विठ्ठलभक्तीची परंपरा सांभाळली.

अंधश्रद्धा, दांभिकतेवर प्रहार
अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची सांगड घातली. धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता आणि बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. आत्मशुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांचा त्यांनी पुरस्कार केला. ईश्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्‍यकता नाही. केवळ ईश्वराचे अंतःकरणपूर्वक चिंतन हवे आहे, ही शिकवण त्यांनी दिली. संत श्री सावता माळी महाराज यांची जीवनदृष्टी पुरोगामी होती. महाराजांनी त्यांच्या सर्व अभंगरचना शेतीकाम करताना केल्या.

वारकऱ्यांची सेवा
पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना पाणी, भाकरी, फळे, फुले देऊन ते पूजा करत असत. माझा शेतमळा हेच माझे पंढरपूर असे ते म्हणत होते. मळ्यात काबाडकष्ट करणे, भाज्या-फळे पिकवणे, वाटसरूला भाकरी देणे हीच माझी विठ्ठलभक्ती आहे. पांडुरंग माझ्या मळ्यात राहतो अशी त्यांची श्रद्धा होती.
योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।।
तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।
प्रपंच करता करता केवळ अंतःकरणपूर्वक नामस्मरण केल्याने ईश्वर प्रसन्न होतो आणि दर्शन देतो, असा विचार त्यांनी आग्रहाने मांडला.

त्यांचे अभंग काशीबा गुरव हे लिहून ठेवत असत. संत सावता माळी यांच्या अभंगरचना या रसाळ आहेत. ज्यामध्ये त्यांनी दैनंदिन जीवनातील शब्द वापरले आहेत.
कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी।
लसूण मिरची कोथिंबिरी। अवघा झाला माझा हरि।।
हा त्यांचा गाजलेला अभंग शेती-मळा आणि विठ्ठल यांची सांगड घालत भक्‍तीची अनुभूती देतो.

संत सावता महाराज आजारी पडल्यावर त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग केला आणि ते अखंड नामस्मरण करू लागले. अरण या त्यांच्या गावी आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (इसवीसन १२९५) रोजी वयाच्या ४५ व्या वर्षी संत सावता माळी पांडुरंगचरणी विलीन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *