संतमंडळीत जेष्ठाचा मान

असलेले संत गोरोबाकाका

वारकरी संप्रदायात ज्येष्ठ, अधिकारी, वैराग्याचा महामेरू म्हणून ओळखले जाणारे संतकवी म्हणजे, संत गोरा कुंभार. संतमंडळात गोरोबाकाका म्हणून प्रिय असणाऱ्या या थोर संताची आज पुण्यतिथी.

उस्मानाबादमधील तेर गावी जन्म
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तेर या गावी येथे १२६७ मध्ये संत गोरा कुंभार यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव रखुमाई आणि वडिलांचे नाव माधवबुवा होते. त्यांच्या वडिलांचे नाव सत्याबा आणि आईचे नाव सुमती होते, असेही काही चरित्रकार सांगतात. तेर गावातील हे कुंभार घराणे धार्मिक आणि सदाचारी म्हणून परिचित होते. येथील काळेश्वर ग्रामदैवताचे ते उपासक होते. तसेच घरात पंढरपूरच्या विठ्ठलाचीही भक्ती होती. वडिलांच्या सांगण्यानुसार गोरोबांनी पंढरपूरची वारी सुरू केली. तिथे त्यांची भेट संत नामदेव आणि समकालीन संतांसोबत झाली.

संत नामदेवांची परीक्षा
तत्कालीन वारकरी संतांमध्ये संत गोरोबा सर्वात ज्येष्ठ होते. त्यामुळे त्यांना सर्व आदराने ‘काका’ संबोधत. गोरोबाकाका मूळचे निर्गुणोपासक, योग आणि ज्ञानमार्गी होते. एकदा संतमेळ्यात संत मुक्ताबाईंनी नामदेवांचे गर्वहरण करण्यासाठी त्यांची परीक्षा घेण्यासाठी डोक्यावर मडकी थापटण्याच्या थोपटण्याने थोपटण्यास सांगितले. गोरोबा काकांनी तसे केल्यावर संत नामदेव संतापले. तेव्हा त्यांना ‘कच्चे’ मडके संबोधून गुरुपदेश घेण्यास सुचविण्यात आले, अशी कथा सांगण्यात येते.

चमत्कारांच्या कथा
संत गोरोबाकाका यांच्या चरित्रात अनेक चमत्कारांच्या कथा सांगितल्या जातात. त्यांना आठ भावंडे झाली पण ती जगत नव्हती. मृत्यूनंतर त्यांना काळेश्वराजवळील स्मशानात गोरीमध्ये मूठमाती देण्यात आली. एकदा देव गोरोबांच्या भेटीला वेष पालटून आले. त्यांनी त्या आठपैकी सात मुलांना हाताच्या स्पर्शाने स्वर्गात पाठविले आणि आठव्या मुलाला म्हणजे गोरोबांना जिवंत करून त्यांच्या मातापित्याकडे सोपविले. देवाने त्यांना गोरीतून बाहेर काढून जिवंत केले, म्हणून त्यांचे नाव गोरोबा पडले. दुसऱ्या एका लोकप्रिय कथेत मडकी घडविण्यासाठी पायाने तुडवीत असलेल्या चिखलात विठ्ठलनामात दंग असलेल्या गोरोबांनी स्वतःच्या बाळाला तुडविले. त्यावेळच्या प्रसंगात गोरोबा पत्नीला रागावून मारायला धावले तर तिने त्यांना ‘मला हात लावाल, तर तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची शपथ’ अशी शपथ घातली. त्यानंतर काही दिवसांनी गोरोबांचा चुकून आपल्या पत्नीला स्पर्श झाला, तर त्यांनी पांडुरंगाची शपथ मोडली म्हणून कोपरापासून स्वतःचे हात तोडून घेतले. गोरोबा अपंग झाल्यामुळे विठ्ठल, रुक्मिणी आणि गरुड रूप पालटून गोरोबांच्या घरी आले आणि त्यांचे कुंभारकाम करू लागले. पुढे संत नामदेवांच्या कीर्तनात नामस्मरणात तल्लीन होऊन टाळ्या वाजविण्यासाठी आपले थोटे हात वर केले असता, त्यांना पुन्हा कोपरापासून हात फुटले तसेच त्यांचा मातीत तुडविले गेलेले बाळही जिवंत होऊन परत आले!
संत गोरोबा काकांच्या अभंगरचना
आपले रोजचे कष्टाचे काम करत असताना गोरोबा काकांनी आपला अभ्यास, चिंतन आणि अभंगरचना करणे सुरूच ठेवले होते. त्यांनी केलेल्या अभंगरचनांपैकी सध्या केवळ २३ अभंगच उपलब्ध आहेत. त्यांपैकी १५ अभंगांमध्ये संत नामदेवांशी संवाद आहे. अनेक अभंगात निर्गुणोपासना सांगणार्‍या योगमार्गाचे वर्णन आहे. तर काही अभंगात सगुण विठ्ठलाचा गौरव आहे. संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत बंका, संत चोखा मेळा, संत एकनाथ, संत निळोबा आदी संतांनी गोरोबांचा महिमा आपल्या अभंगांतून गायला आहे.
शके १२३९ चैत्र कृष्ण त्रयोदशीला (२०एप्रिल १३१७) गोरोबा काकांनी आपल्या गावी म्हणजे तेर येथे तेरणा नदीच्या उत्तर काठावर समाधी घेतली.

अभ्यासक आणि मंदिरे
संत गोरोबा काकांच्या अभंग आणि चरित्राचा अनेक अभ्यासकांनी अभ्यास केला आहे. त्यात दीपक खरात, डॉ. प्रकाश कुंभार, डॉ. बाबुराव पाध्ये, डॉ. धोंडिराम कुंभार, रामलिंग कुंभार, विलास राजे, विलास तुळे, वेदकुमार अलंकार, आदी लेखकांची गोरोबा काकांवरील पुस्तके प्रसिद्ध आहेत. १९७८मध्ये संगीत ‘संत गोरा कुंभार’ हे नाटक, १९४०, १९४२ आणि १९६७मध्ये ‘संत गोरा कुंभार’ नावाचे सिनेमे आले. तसेच १९८१मध्ये ‘भक्त गोरा कुंभार’ नावानेही सिनेमा आला. संत गोरोबा काकांची अनेक ठिकाणी मंदिरे आहेत. त्यापैकी तेर, पंढरपूर, आळंदी, पैठण, सांगलीतील सागाव, पुणे जिल्ह्यातील राहू, शिरोली बुद्रुक, औरंगाबादमधील दौलताबाद, बजाजनगर, तुर्काबाद खराडी, काटे पिंपळगाव, वैजापूर, सातारा जिल्ह्यातील कोकिसरे, रत्नागिरीमधील कुंभार्ली, परभणीमधील सेलू, रायगडमधील कर्जत, नागपुरातील लालगंज आदी ठिकाणी संत गोरोबा काकांची मंदिरे आहेत. उत्तम भारतात जम्मू येथेही गोरोबकाकांचे मंदिर आहे. दरवर्षी २७ फेब्रुवारीला इथे मोठा उत्सव असतो. त्यासाठी हजारो भाविक येतात. या मंदिरातील लंगर प्रसिद्ध आहे.

गोरोबा काकांच्या तेर ढोकी येथील स्मृती
तेर या संत गोरोबा काकांच्या समाधी मंदिरापासून जवळच त्यांचे ढोकी गाव आहे. तेथून तेरला दर महिन्याला पायी वारी जाते. तेरमध्येही त्यांचे राहते घर आहे. तेर गावात गोरोबा काकांचा नैवेद्य वैशिष्ट्यपूर्ण असतो. दुपारी समाधीला नैवेद्य दाखवला जातो. त्याआधी गावातून ‘गोरोबा काकांचा नैवेद्य’ अशी हाळी देत एक टोपली फिरवली जाते. जिच्यात गृहिणी स्वयंपाक करताना गोरोबा काकांसाठी बनविलेली पहिली भाकरी आणि भाजी वाढतात. हा नैवेद्य मग काकांना दाखवला जातो. नंतर या टोपल्यांमधील हा प्रसाद मंदिरातील सेवेकरी आणि भाविकांना वाटला जातो.

मंदिरात विविध कार्यक्रम
दर महिन्याच्या वद्य एकादशीस रात्री मंदिर उघडे ठेवतात. चातुर्मासात नित्यक्रमासोबत अनेकांच्या सकाळी पूजेनंतर आरती होण्याआधी गाथा भजन होते. भागवत, ज्ञानेश्वरीचे आणि भावार्थ रामायणाचे पारायण होते. चैत्र वद्य पक्षात गोरोबा काकांचा समाधी उत्सव असतो. चैत्र वद्य दशमीला उत्सवाची सुरुवात होते. एकादशीला मुख्य महापूजा होते. चैत्र वद्य त्रयोदशी हा गोरोबा काकांचा समाधी दिवस. या दिवशी सकाळी १० ते १२च्या दरम्यान समाधी वर्णनाचे कीर्तन होते. ही कीर्तनसेवा पंढरपूर येथील तुकोबारायांचे वंशज असलेल्या देहूकर मंडळींकडे आहे. दुसऱ्या दिवशी काला होऊन उत्सवाची सांगता होते. या काल्याचे येथील वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम नरसिंह मंदिरात होतो. यासाठी गोरोबाकाकांची पालखी नरसिंह मंदिरात येते. येथे दहीहंडी फोडल्यावर गोरोबाकाकांची पालखी पळवत लगेच मंदिराकडे परत आणली जाते. यावेळी पालखीसोबत फक्त पालखी उचलणारे भोई आणि विणेकरी एवढीच मंडळी उरतात. अक्षय तृतीयेनंतर प्रक्षाळ पूजा होऊन उत्सव संपतो. दशमीपासून प्रक्षाळ पूजेपर्यंत मंदिर अहोरात्र दर्शनासाठी खुले असते. या उत्सवानंतर तेरमधील मंदिरात वैशाख वद्य एकादशीला चंदन उटी होते. रोज थोडे थोडे चंदन उगाळून वाळवून ठेवले जाते. या सुमारे २० दिवस उगाळून ठेवलेल्या चंदनात हळद आणि अष्टगंध मिसळतात. या चंदनाने समाधीवर गोरोबाकाकांचे चार ते साडेचार फूट उंचीचे रूप साकारले जाते. कधी उभ्या, कधी घोड्यावर बसलेल्या अशा वेगवेगळ्या रुपात ही उटी केली जाते.
आषाढी ऐवजी कार्तिकी वारी
आषाढी वारीसाठी महाराष्ट्रातून विविध संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात. गोरोबा काकांची पालखी मात्र कार्तिकी वारीला पंढरपूरला जाते. या पालखीचे प्रस्थान दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी होते. प्रस्थान नदीकाठच्या समाधी मंदिरातून न होता गोरोबा काकांच्या गावातील राहत्या घरातून होते. ही पालखी अगोदर समाधी मंदिरात आणली जाते. नंतर ती पंढरीकडे निघते. गोरोबाकाकांच्या पालखीला निरोप देण्यासाठी गावातल्या माहेरवाशिणी आवर्जून येतात. तसेच माहेरी गेलेल्या सासुरवाशिणीही भाऊबीज उरकून गावी परततात. या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यात अजूनही रथाचा वापर होत नाही. पालखी पूर्वापार पद्धतीन खांद्यावर वाहून नेली जाते. नऊ दिवसांचा मुक्काम करून दहाव्या दिवशी पालखी पंढरपुरात पोहोचते. संत मेळ्यात ज्येष्ठाचा मान असणाऱ्या, कामातच राम शोधणाऱ्या आणि सगुण-निर्गुण भक्तीची सांगड घालणाऱ्या संत गोरोबा काकांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *