आज पालखीचा मुक्काम
नाशिकमधील सातपूर येथे
त्र्यंबकेश्वर : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने आज (दि. १३) सकाळी १० वाजता आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. यावेळी विठुरायाच्या नामघोषाने अवघी त्रंबकेश्वरनगरी दुमदुमून गेली. आज पालखीचा पहिला मुक्काम नाशिकमधील सातपूर येथे आहे. मंगळवारी (दि. १४) रोजी सकाळी नाशिक पंचायत समितीत पालखीचे स्वागत होईल आणि शहरातून पालखी सोहळा रवाना होईल. सोहळ्याचा दुसरा मुक्काम पंचवटीत असेल.
दोन वर्षांच्या खंडामुळे गर्दी
श्री निवृत्तीनाथ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे ज्येष्ठ बंधू आणि गुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या पालखी सोहळ्याला वारकऱ्यांमध्ये महत्त्व आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे भाविकांना वारकऱ्यांना पंढरपूरला आषाढी पायी वारीसाठी जाता आले नव्हते. वारीत खंड पडल्याने विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेले वारकरी मोठ्या संख्येने श्री निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. प्रथेप्रमाणे सकाळच्या वेळी समाधीची पूजा झाल्यावर ह. भ. प. सुरेश महाराज, जयंत महाराज गोसावी, उपस्थित वारकरी आणि फडकरी यांनी भजन केले.
सजवलेल्या पालखीतून नाथांची चांदीची प्रतिमा आणि पादुका भाविकांनी केलेल्या जयघोषात चांदीच्या रथात ठेवून सवाद्य रथ कुशावर्तावर अभिषेक पूजेसाठी नेण्यात आला. तेथे पूजक गोसावी आणि काण्णव यांनी पौरोहित्य केले. तेथून भजन कीर्तन करत पालखी मंदिरासमोर आणण्यात आली. तेथे बाहेरुन दर्शन करून पालखी नाशिककडे रवाना झाली. पालखीस स्थानिकांनी जव्हार चौफुलीवर निरोप दिला. पालखीसमवेत मोठ्या प्रमाणात दिंड्या आणि नृत्य करणारे पाच अश्व आहेत. दरमजल प्रवास करीत पालखी २६ दिवसांनी पंढरपूरला पोहचेल.
पालखीचा प्रवास २७ दिवसांचा
त्र्यंबकेश्वर येथे श्री निवृत्तीनाथांची समाधी आहे. तेथून वारीचा २७ दिवसांचा पायी प्रवास पंढरपूरकडे होतो. येथे पोहोचल्यानंतर ५ दिवस पालखी पंढरपुरात मुक्कामी असताे. त्यानंतर पौर्णिमेला त्र्यंबकेश्वरच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू होतो. १८ दिवसांनी पालखी त्र्यंबकेश्वरला पोहोचते. आषाढी वारी निघाल्यानंतर वारीत ठिकठिकाणाहून ४६ दिंड्यांच्या माध्यमातून ७० ते ८० हजार भाविक सहभागी होतात. पालखी सोबत सर्व वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी आणि स्वयंसेवक आहेत.