आई आणि वडिलांची सेवा करणाऱ्या
भक्त पुंडलिकांचा पंढरपुरात उत्सव
वारकरी संप्रदायाची विचारधारा काय? असं विचारलं तर साहजिकच समता, बंधुता, मानवता जपणारा विचार असं उत्तर मिळेल. पण याच विचारांत सामावलेलं आणखी एक सोपं उत्तर आहे. ते म्हणजे, ‘आई-वडिलांची सेवा, हीच खरी ईश्वरसेवा’ असं मानणारा आणि त्याप्रमाणे आचरण करणारा वारकरी.
पंढरीला गेल्यावर चंद्रभागेत स्नान करून पहिल्यांदा भक्त पुंडलिकाचे दर्शन आणि मगच श्री विठ्ठलाचं दर्शन, असा क्रम वारकरी पाळतात. आपल्या आईवडिलांची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकाला देव प्रसन्न झाला. त्यानं पुंडलिकाला दर्शन दिलं, पण पुंडलिकाने त्याच्यासमोर वीट भिरकावली आणि तिच्यावर उभा राहा म्हणाला. कारण त्याला आजारी आईवडिलांच्या सेवेतून देवासोबतच बोलायला त्याला वेळ नव्हता. हा देव म्हणजे द्वारकेहून आलेला श्रीकृष्ण. पुंडलिकाची मातापित्याची सेवा पाहून देव प्रसन्न झाला आणि तुला मी काय वर देऊ, असं विचारलं. त्यावर ‘तू असाच विटेवर उभा राहा आणि जे आपल्या आईवडिलांची सेवा करतील, त्यांना प्रसन्न हो…’ असा वर पुंडलिकाने मागितला. त्यावर ‘तथास्तु’ म्हणून देव श्री विठ्ठल रुपात पंढरपुरात विटेवर उभा राहिला. शिवाय ‘तू आईवडिलांचा परमभक्त असल्याने लोक पहिल्यांदा तुझं दर्शन घेतील, मग माझ्या दर्शनाला येतील’, असाही वर देऊन टाकला. एवढेच नव्हे तर, ‘पुंडलिका वर दे, हरी विठ्ठल’ असा देवाच्या नावाअगोदर जयजयकार करण्याचा सन्मानही दिला. त्यामुळे पंढरपुरात जाणारा प्रत्येक भाविक हा पहिल्यांदा पुंडलिकाच्या पायाशी नतमस्तक होतो.
अशा या भक्तराज पुंडलिकाचा आज म्हणजे माघ शुद्ध दशमी रोजी उत्सव साजरा केला जात आहे. श्री विठ्ठल अठ्ठावीस युगे विटेवर उभा आहे. त्याच्यासोबत किंबहुना त्याच्याही अगोदरपासून पुंडलिकाचं पंढरपुरात वास्तव्य आहे. महाभारतकालापासून पुंडलिकमुनी असावेत, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. सातवाहन काळातही त्यांचे उल्लेख मिळतात. वैकुंठातून आलेल्या देवाला विटेवर उभा करून पंढरपूरच भूलोकीचे वैकुंठ बनविणाऱ्या भक्त पुंडलिकाच्या उपकाराचे वर्णन मध्ययुगातील सर्व संतांनी केले आहे. या पुंडलिकाला साक्षी ठेवूनच त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात समतेचा खेळ मांडला. कर्नाटकात मेळकोटो गावात पुंडलिकाचे मंदिर आहे. भक्कम शरीरयष्टी असलेली, कानटोपी, धोतर, वीणा, चिपळ्यांसह भजनात तल्लीन झालेली भव्य मूर्ती इथे पाहावयास मिळते.
पंढरपुरात चंद्रभागा नदी पात्रातच पुंडलिकाचे मोठे दगडी मंदिर आहे. महादेव कोळी समाज या मंदिराचा कारभार पाहतो. माघ महिन्यात इथे देवस्थान कमिटीतर्फे भव्य काला महोत्सव साजरा होतो. पौष वद्य त्रयोदशी ते माघ शुद्ध त्रयोदशी या दरम्यान हा ‘पुंडलिकराय उपकार स्मरण सोहळा’ साजरा होतो. या पर्वकाळात पहिले पंधरा दिवस विठ्ठल मंदिराचा सभामंडप आणि चंद्रभागेवर घाट बांधणारे जळोजी मळोजी महाराज यांचा उत्सव साजरा होतो. तर दुसऱ्या पंधरवड्यात भक्त पुंडलिक संत कालासोहळा साजरा होतो. यानिमित्ताने पुंडलिक मंदिराच्या सभामंडपात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. माघ शुद्ध दशमीला समस्त कोळी समाजातर्फे अन्नदान केले जाते. याच दिवशी कोळी बांधव आपापल्या घरातून भाजी चपातीचा नैवेद्य आणून पुंडलीकरायांना दाखवितात. त्रयोदशीला सांगतेच्या दिवशी दिंडीकरी, फडकऱ्यांना महाप्रसाद देऊन गौरविले जाते.
आषाढी यात्रेच्या वेळी इतर संतांसोबतच भक्त पुंडलिकांचीही दिंडी श्री ज्ञानेश्वर माऊलींसोबत असते. तर कार्तिकी यात्रेच्या वेळी माऊलींना भेटण्यासाठी भक्तराज पुंडलिकांची दिंडी आळंदीला जाते. वर्षभरातही विविध सोहळे भक्त पुंडलिक देवस्थान समितीच्या वतीने साजरे केले जातात. अशा या मातापित्याची सेवा करण्याचा संदेश देणाऱ्या आणि देवालाही भक्तांसाठी पंढरपुरात विटेवर उभे करणाऱ्या पुंडलीकरायांच्या चरणी वार्षिक
।।ज्ञानबातुकाराम।।चा साष्टांग दंडवत…🙏
लवकरच आपल्या सेवेत येत आहे – www.dnyanbatukaram.com