समाज प्रबोधनासाठी आयुष्य
समर्पित केलेले समर्थ रामदास
आधी प्रपंच करावा नेटका। मग घ्यावे परमार्थ विवेका।। अशा संदेश देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींनी स्वतः अविवाहित राहून ‘शहाणे करुनी सोडावे बहुत जन’ या उक्तीप्रमाणे आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या प्रपंचासाठी अर्थात प्रबोधनासाठी खर्च केले. अत्यंत सोप्या, नेटक्या आणि थेट भाषेत साहित्य लिहिणाऱ्या रामदास स्वामींनी माघ वद्य नवमी शके १६०३ (सन १६८१) सज्जनगडावर देह ठेवला. आजचा हा दिवस सर्वत्र ‘दास नवमी’ म्हणून साजरा केला जातो.
श्रीराम आणि श्रीहनुमान भक्तीच्या माध्यमातून रामदास स्वामींनी समाजाला उपदेश केला. ‘दासबोध’ हा ग्रंथ लिहून जनतेला जीवन जगण्याची दिशा दाखवली. समर्थ रामदासांचे मूळ नाव नारायण सूर्याजीपंत कुलकर्णी (ठोसर) होते. त्यांचा जन्म १६०८मध्ये जालना जिल्ह्यातील जांब गावी रामनवमीच्या दिवशी झाला. त्यांचे वडील सूर्याजी पंत आणि आई राणूबाई सूर्योपासक होत्या. सूर्याच्या कृपेनेच आपणाला गंगाधर स्वामी आणि नारायण (समर्थ रामदास) हे दोन पुत्र झाल्याची त्यांची श्रद्धा होती. रामदास स्वामींचे भाऊ गंगाधर हेसुद्धा अध्यात्मातील अधिकारी पुरुष होते. त्यांनी ‘सुगामोपे’ नावाचा ग्रंथ रचला आहे.
‘तू दिवसभर खोडसाळ खेळतोस, काही काम कर. तुझा मोठा भाऊ गंगाधर त्याच्या कुटुंबाची किती काळजी घेतो… त्यावरून नारायण अंतर्मुख झाला आणि एका खोलीत ध्यानस्थ बसला. दिवसभर शोधाशोध केल्यानंतर आईवडिलांना ध्यानस्थ नारायण दिसला. इथं काय करतोस असं विचारल्यावर, ‘चिंता विश्वाची करतो’ असे उत्तर दिले. नंतर नारायणाचा विवाह ठरला. मात्र, बोहोल्यावर उभे असताना ‘सावधान’ शब्द ऐकताच त्याने मांडवातून धूम ठोकली. यानंतर त्यांनी पंचवटी येथे जाऊन रामाचे दर्शन घेतले आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. रोज पहाटे उठून ते १२०० सूर्यनमस्कार घालत. रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला, असे सांगितले जाते. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला, असेही म्हणतात. तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले. समाजस्थितीचे निरीक्षण केले. वयाच्या ३६व्या वर्षी रामदासस्वामी महाराष्ट्रात परतले.
तत्कालीन समाज चोहोअंगांनी दुर्बल झाला आहे, त्याने आत्मविश्वास गमावला आहे, असे निरीक्षण त्यांनी भारत भ्रमणादरम्यान केले. समाजाला आत्मविश्वास मिळवून देण्याचा त्यांनी निश्चय केला. आणि त्यानुसार कार्य सुरू केले. त्यांनी तरूणांना एकत्र केले. श्री हनुमानाचा आदर्श सांगत बलोपासनेची दीक्षा दिली. त्यासाठी गावोगावी हनुमानाची मंदिरे उभारली. समर्थ संप्रदाय स्थापन करून १,१०० मठ स्थापन केले. सुमारे १,४०० तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि ११ मारुतींची देवळे याच परिसरात आहेत.
शिवरायांच्या स्वराज्यालाही रामदासस्वामींनी बळ दिल्याचे दाखले दिले जातात.याशिवाय लिखित साहित्यातूनच समाजप्रबोधन होऊ शकते हे लक्षात घेऊन समर्थांनी विपुल वाङ्मय निर्मिती केली. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, अनेक आरत्या उदाहरणार्थ, ‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही गणपतीची आरती, ‘लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा’ ही शंकराची आरती, अशा त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. याशिवाय रामायणातील किष्किंधा, सुंदर आणि युद्ध ही कांडे, अनेकविध अभंग, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यांतील उत्सव यांसंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षड्रिपु-विवेक आदी विषयांवरील विपुल लेखन समर्थांनी केले.
पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी समर्थ रामदास स्वामी गेले असता त्यांनी म्हटलेले काव्य प्रसिध्द आहे.
इथे कारे उभा श्रीरामा। मन मोहन मेघ:श्यामा।
चाप बाण काय केले। कर कटावरी ठेविले।
का बा धरिला अबोला। का रे वेष पालटला।।
काय झाली अयोध्यापुरी। इथे वसवली पंढरी।।
शरयू गंगा काय केली। कैची भीमा मेळवली।।
कुठे वानरांचा मेळा। दिसे हनुमंत एकला।
काय झाली सीतामाई। इथे आणली रखुमाई।।
रामी रामदासी भाव। तैसा होय पंढरीराव॥
माघ वद्य नवमीला ‘जय जय रघुवीर समर्थ ‘ असा घोष करत रामदास स्वामींनी देह ठेवला. हीच तिथी श्रीरामदास नवमी म्हणून साजरी केली जाते. आपल्या समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या श्रीरामदास स्वामींना ।।ज्ञानबातुकाराम।। परिवारातर्फे त्रिवार अभिवादन.