जनावरांचा सुटीचा वार ठरविणारे
पुरंदरचे श्री सटरफटर महाराज
आपल्याला कामगारांना आठवड्यातून एक दिवस म्हणजे रविवारची सुटी मिळवून देणारे कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे माहिती आहेत. किंवा ग्रामीण संस्कृतीत शेतकऱ्यांच्या लाडक्या बैलांच्या विश्रांतीचा हक्काचा सण म्हणजे बैलपोळा हेही आपणास माहिती आहे. परंतु सुमारे १३० वर्षांपूर्वी शेतात राबणारे बैल आणि शेतकऱ्यांना उपयुक्त असणाऱ्या जनावरांना आठवड्यातून एकदा म्हणजे सोमवारी हक्काची सुटी देण्याची कल्पना एका अवलियाने मांडली आणि ती प्रत्यक्षातही आणली. त्या सत्पुरुषाचे नाव श्री सटरफटर महाराज. महाराजांच्या वैशिष्ट्यपूर्ण नावाची दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. या महाराजांची आज १२८ वी पुण्यतिथी.
निसर्गोपचारांतून जोडले लोक
श्री सटरफटर महाराजांचे मूळ नाव, गाव अज्ञात आहे, पण त्यांची कर्मभूमी आहे, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील धालेवाडी उर्फ कऱ्हानगर. देशभ्रमण करून आलेले महाराज १८७२मध्ये ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून उगम पावलेल्या कऱ्हानदीकाठच्या धालेवाडी गावातील महादेवाच्या मंदिरात विसावले. मंदिरात पूजाअर्चा करणे, गावात फिरून भिक्षा मागणे आणि पुन्हा मंदिरात येऊन थांबणे हा महाराजांचा दिनक्रम झाला.
मंदिरात आलेल्या भक्तांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, महाराज बोलत नाहीत. त्यांचे मौनव्रत आहे. हळूहळू संपर्क वाढल्यावर महाराज आपले म्हणणे लिहून सांगू लागले. हिमालयात वास्तव्य करून परतलेल्या महाराजांना वनौषधी आणि नैसर्गिक उपचारांची माहिती होती. मंदिरात आलेल्या भाविकांना ते त्याबाबत मार्गदर्शन करू लागले. त्यामुळे मंदिरात त्यांना भेटण्यासाठी गर्दी वाढू लागली.
संतांचा प्रेमाचा संदेश गावोगावी रुजवला
महाराज मग पंचक्रोशीत गावोगावी जाऊ लागले. लोकांनी त्यासाठी त्यांना घोडा घेऊन दिला. अशा रितीने धालेवाडी आणि कऱ्हा नदीकाठच्या गावांमध्ये महाराजांचा संपर्क वाढला, तसेच अनुयायी वर्गही वाढला. “भेदभाव मानू नका, आपसात बंधुभावाने, प्रेमाने आणि एकोप्याने राहा, प्राणीमात्रांवर दया करा” हा संतांचा उपदेश ते लोकांमध्ये रुजवू लागले. लोक महाराजांचा सल्ला मानू लागले.
जनावरांना सुट्टी देण्याची अभिनव कल्पना
अशातच लोकजीवनाशी समरस झालेल्या महाराजांनी एक अभिनव कल्पना मांडली आणि लोकांनी ती मान्य केली. ती म्हणजे, आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी शेतात राबणाऱ्या जनावरांना हक्काची सुट्टी द्यायची! त्यादिवशी औतकाठी बंद! या सुट्टीमुळे जनावरांना आणि त्यासोबतच माणसांनाही विसावा मिळाला. मग महाराजांनी माणसांना सद्विचार, सदवर्तनाकडे नेण्यासाठी मंदिरात भजन, कीर्तन सुरू केले. शेजारील सासवड गावात संत ज्ञानोबांचे संत सोपानदेव यांची समाधी आहे. शिवाय आषाढी वारीला पंढरपूरला जाणारी ज्ञानदेवांची पालखी आणि त्यासोबत हजारो वारकरी सासवड परिसरात थांबतात. भजन, कीर्तन, टाळ मृदंगाचा गजर घुमतो. त्यामुळे या परिसरातील लोकांवर संतविचारांचे संस्कार आहेत. ते अधिक समृद्ध व्हावेत म्हणून महाराजांनी गावात भजनी मंडळ सुरू केले. हे भजनी मंडळ आणि जनावरांची सोमवारची सुट्टी या दोन्ही गोष्टी परिसरातील मंडळींनी जपून ठेवल्या आहेत.
‘सटरफटर’ नावाचा इतिहास
महाराजांच्या नावाची गोष्टही वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराजांसोबत परिचय वाढला, तसे लोक त्यांना नाव विचारू लागले. खरे तर स्वतःचे नाव प्रसिद्ध व्हावे, अशी इच्छा खऱ्या साधूसंताना अजिबात नसते. उलट नाव आणि प्रसिद्धीच्या बडेजावामुळे सामान्य लोक आपल्यापासून चार हात दूर राहतात. ते होऊ नये, लोकांमध्ये आपल्याला मिसळता यावे म्हणून, नावाचा बडेजाव, उंची कपडे आणि राहणीमान असे साधू टाळतात. अलिकडच्या काळात गाडगेबाबा त्याचं उत्तम उदाहरण. म्हणूनच शेक्सपिअरसारखाच प्रश्न महाराजांनी लोकांना विचारला. नावात काय आहे? त्यावाचून माझे काही अडत नाही, असे ते म्हणाले. पण लोकांनी फारच आग्रह धरल्यावर तुम्हाला वाटेल त्या ‘सटरफटर’ नावाने मला हाक मारा, असे महाराज म्हणाले. झालं, लोक त्यांना ‘सटरफटर महाराज’ म्हणूनच संबोधू लागले.
पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रम
आजही सटरफटर महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गावात श्री समर्थ सटरफटर महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पूजा, अभिषेक झाल्यानंतर महाराजांच्या पादुकांची पालखीत घालून मिरवणूक काढली जाते. पंचक्रोशीतील भजनी मंडळांचा भूपाळी आणि भजनाचा कार्यक्रम होतो. महाप्रसाद होतो. गावात सटरफटर महाराजांची समाधी आहे. तिची नित्य पूजाअर्चा होते. परगावचे भाविकही आवर्जून महाराजांच्या दर्शनासाठी येतात. अजूनही गाव सटरफटर महाराजांनी दाखविलेल्या माणुसकीच्या वाटेवर चालते आहे. भूतदया जपणाऱ्या या गावाने नुकताच एक विक्रम केला आहे. आणि तो म्हणजे गावातील सर्व कुटुंबांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना मानवतेच्या मार्गावर नेणाऱ्या या सत्पुरुषास अर्थात सटरफटर महाराजांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!