‘रोजचं काम हाच विठ्ठल’ असा
संदेश देणाऱ्या धापेवाड्यातील यात्रा
पंढरपुरात आषाढी आणि कार्तिकी एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नागपुरातील कळमेश्वर तालुक्यात असणाऱ्या धापेवाडा इथं भक्तांचा गोतावळा जमतो. कीर्तन-भजनात भाविक तल्लीन होतात. हे धापेवाडा विदर्भातलं प्रतिपंढरपूर आहे. आज इथं विठ्ठल-रुक्मिणीची यात्रा भरली आहे. वसंतपंचमी आणि षष्ठी हे यात्रेचे दोन मुख्य दिवस.
विठ्ठल-रखुमाईसह चंद्रभागा
नागपूर शहरापासून ३५ किलोमीटरवर असलेल्या धापेवाडा गावात स्वयंभू विठ्ठल-रखुमाईसोबतच ‘चंद्रभागा’देखील आहे. वसंतपंचमी आणि षष्ठीला इथं विठ्ठल-रुक्मिणीची यात्रा भरते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम होतात. यंदा कोरोनामुळे उत्सवावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हा उत्सव होत असल्याची माहिती स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर ट्रस्टचे सचिव आदित्य रुद्रप्रतापसिंह पवार यांनी दिली.
अशी आहे मंदिराची परंपरा
श्रीसंत कोलबास्वामी महाराज हे निस्सीम विठ्ठलभक्त होऊन गेले. ते मूळचे उमरेड तालुक्यातील बेला गावचे होते. विणकामाचा व्यवसाय करायचे. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. आपलं काम हाच विठ्ठल हाच त्यांचा मूलमंत्र होता. मात्र, एकदा त्यांच्या पत्नीने पंढरपूर येथे जाण्याचा हट्ट केला. त्यावर कोलबास्वामी यांनी तशी तयारीदेखील केली. त्याचवेळी त्यांना दृष्टांत झाला आणि धापेवाडा येथे चंद्रभागा नदी काठावरच्या एका विहिरीत विठ्ठल-रक्मिणीची मूर्ती त्यांना सापडली. तेव्हा निर्जला एकादशीचा मुहूर्त साधून विठ्ठल-रक्मिणी मूर्तीची स्थापना करण्यात आली. या घटनेला आता जवळपास ३०० वर्षे होत आहेत, अशी अख्यायिका भाविक सांगतात. तेव्हापासून आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.
वसंतपंचमीचे महत्त्व
श्रीसंत कोलबास्वामी महाराज हे धापेवाडा इथं आल्यानंतर त्यांना गुरू रंगारी महाराज यांचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यांनीच कोलबास्वामी यांना उपदेश दिला. पुढे गुरू रंगारी महाराज आदासा येथे गेले आणि तेथून लुप्त झाले. तो दिवस पुण्यतिथीचा मानून कोलबास्वामी महाराज यांनी वसंतपंचमी हा गुरूची पुण्यतिथी म्हणून साजरी करण्याचे ठरवले. सुमारे तीन दशकांपासून ही प्रथा सुरू आहे. या उत्सवानिमित्त येणारे भाविक आधी विठ्ठल-रुक्मिणी आणि नंतर श्रीसंत कोलबास्वामी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतात. ही भाविकांची संख्या दरवर्षी ३० हजारांच्या घरात असते. यात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि गुजरातमधूनही भाविक येतात. यात्रेनिमित्त घरोघरी नातलगांचे आगमन होते.
कार्तिक द्वादशी हीच जणू दिवाळी
जशी पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीला भव्य यात्रा भरते, अगदी तशीच यात्रा इथं कार्तिक द्वादशीला भरते. या आधी दिवाळी होऊन गेलेली असते. पण, धापेवाड्यात या द्वादशीलाच दिवाळीसारखे वातावरण असते.सर्वत्र दिवाळी काळात लेकीबाळी माहेरी येतात. पण, धापेवाडा इथं मात्र कार्तिकी द्वादशीला लेकीबाळी आणि सगेसोयरे येतात. बाळगोपाळांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. खऱ्या दिवाळीसारखाच उत्साह या काळात असतो.
सामाजिक उपक्रम
धापेवाडा विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टतर्फे विविध सामाजिक उपक्रमही आयोजित केले जातात. यात प्रामुख्याने ट्रस्टचे सभागृह विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिले जाते. शिवाय, नियमित स्वरुपात आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जातात. विविध प्रसंगी अन्नदानाचे कार्यक्रम, विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांसाठीदेखील ट्रस्टतर्फे मदत केली जाते.