अष्टलक्ष्मी संत विचार संमेलन
राजधानी आगरतळा येथे सुरू
आगरतळा (त्रिपुरा) : टाळ-मृदंगाचा गजर आणि विठुमाऊलीच्या जयघोषाने आज (दि. ९) त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा दुमदुमून गेली. निमित्त होते, येथे आजपासून सुरू झालेले अष्टलक्ष्मी संत विचार संमेलन. या दोन दिवसांच्या संमेलनाची सुरुवात भल्या सकाळी शोभायात्रेने झाली.
त्रिपुरा सरकारचा पर्यटन विभाग, अमरवाणी इव्हेंट फाऊंडेशन आणि इंडस मून प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यामाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाची सुरुवात म्हणून उज्जयंता पॅलेस ग्राऊंड ते रवींद्र शताब्दी भवन या शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेतील महाराष्ट्रातील छोट्या वारकऱ्यांच्या दिंडीने लक्ष वेधून घेतले. या शोभायात्रेत आषाढी वारीला पंढरीच्या वाटेवर होते तसे गोल रिंगणही साकारण्यात आले.
या शोभायात्रेत ईशान्य आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ‘भक्तीसंगम’ पाहायला मिळाला. ईशान्येकडील राज्यांमधील पारंपरिक नृत्य प्रकारांचाही यात समावेश होता. ही शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती. शांती काली आश्रमाचे महंत चित्त महाराज यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत मान्यवर साधू, संत, अभ्यासकांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
त्यानंतर संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमातही महाराष्ट्राच्या वारकऱ्यांनी कृष्णगीतावर आधारीत नृत्याविष्कार सादर केला. पांढऱ्या पेहरावातील या वारकरी शांतीदूतांनी आपल्या कुशल सादरीकरणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
आज (शुक्रवार दि. ९) आणि उद्या (शनिवार दि. १०) होणारे हे संमेलन कोल्हापूर येथे पार पडलेल्या पहिल्या विश्वात्मक साहित्य संमेलनाचेच प्रतिरूप आहे. ‘सर्वे भवन्तु सुखीना सर्वे संतू निरामया’ असा संदेश या संमेलनाद्वारे देण्यात येत असल्याचे पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ह. भ. प. न्यायमूर्ती डॉक्टर मदन महाराज गोसावी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तर यानिमित्ताने देशभरातील संताच्या मानवतेच्या विचारांना उजाळा मिळेल, असे संत साहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांनी म्हटले आहे.
या संमेलनामध्ये ईशान्येकडील राज्यांमधील संत साहित्याचे अभ्यासक सहभागी झाले आहेत. राज्यांचे मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री या संमेलनाला हजेरी लावणार आहेत. संत विचारांवरील परिसंवाद, परदेशी विचारवंतांचा अध्यात्मविषयक परिसंवाद, आणि ईशान्येकडील राज्यांच्या लोककलांचे दर्शन असे या संमेलनाचे स्वरूप असणार आहे. अध्यक्ष त्रिपुरातील चित्त महाराज या संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
संमेलनातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
दिनांक ९ डिसेंबर २०२२ –
उद्घाटन सत्र- मुख्य अतिथी- उपमुख्यमंत्री (त्रिपुरा सरकार) विष्णू देव वर्मा
संमेलनाध्यक्ष – श्री चित्त महाराज, महंत, शांती काली मंदिर
कार्याध्यक्ष – डॉ. मदन गोसावी, सदस्य, एनसीएलटी.
सत्र पहिले – भारताच्या ईशान्येकडील राज्यांमधील आध्यात्मिक परंपरा आणि प्रथा
सत्र दुसरे – भारताच्या ईशान्येकडील राज्यांची पारंपारिक मुळे – योगिक, तांत्रिक आणि उपचार परंपरांचा इतिहास शोधणे
ईशान्य पूर्व विभागीय सांस्कृतिक समितीद्वारे
(NEZCC) आमंत्रित केलेल्या मंडळांचा सांस्कृतिक कार्यक्रम
दिनांक १० डिसेंबर २०२२ –
सत्र ३- ईशान्य भारत – तीर्थयात्रा आणि पर्यटनाच्या संधी
सत्र ४ – शेजारील देशांतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक परंपरांचे सादरीकरण
सत्र ५ – ईशान्य भारताच्या परंपरांसमोरील आव्हाने
राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप समारंभ.