माऊली-तुकोबांच्या सोहळ्यात
अशी सुरू झाली पत्रकारिता
पत्रकारांनी केलेल्या वार्तांकनातून पालखी सोहळ्याचा इतिहास लिहिला जात आहे. या सर्व प्रतिनिधींना सुविधा मिळाव्यात, त्यांचे काम सोपे व्हावे, म्हणून पालखी सोहळा पत्रकार संघ स्थापन करण्यात आला. त्यासाठी पुढाकार घेतला ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे यांनी. १९९० पासून वारीचे वार्तांकन करणाऱ्या भिसे यांनी लिहिलेले हे वारीचे अनुभव…
पंढरपूरच्या आषाढी पायी वारीची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. पण या वारीतील पालख्या, दिंड्या, वारकरी यांची पहिली लिखित नोंद ठेवली ती, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी. १८८२ मध्ये पुण्यातून पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांमधील वारकऱ्यांसोबत संवाद साधला आणि त्यांच्या नोंदी करून ठेवल्या. दुर्दैवाने न्यायमूर्तींच्या अगोदर किंवा नंतरच्या काळातही या तपशीलवार नोंदी कोणीही ठेवल्या नाहीत. त्यामुळे पालखी सोहळ्याचा सर्वांगीण इतिहास वाचायला मिळत नाही. अलिकडच्या काळात माध्यमांतून या सोहळ्याचे वार्तांकन होऊ लागले आहे. वार्तांकनासाठी पालखी सोहळ्यात २० ते २२ दिवस सहभागी होण्यासाठी विविध माध्यमे आपले प्रतिनिधी पाठवू लागली आहेत.
देवाची वारी आणि संतांची वारी
शुध्द एकादशीला पंढरीची म्हणजे ‘देवाची वारी’ आणि वद्य एकादशीला आळंदीची म्हणजे ‘संतांची वारी’ ही वारकरी सांप्रदायाची धारणा आहे. पूर्वी म्हणजे १९९० पूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा मर्यादित होता. रथापुढे २७ दिंड्या आणि रथामागे १०१ दिंड्या असे साधारणतः २० ते २५ हजार वारकरी या सोहळ्यात चालत होते. १९९०मध्ये माझे सद्गुरु आणि नाथ सांप्रदायातील महानयोगी प. पू. श्री. डॉ. भाईनाथ महाराज कारखानीस (वेळापूर) यांच्या सांगण्यावरून मी पत्रकार म्हणून या पालखी सोहळ्यात सहभागी झालो. त्यावेळी मी तरुण भारत या वृत्तपत्रामध्ये बातमीदार म्हणून सोलापूर आवृत्तीसाठी काम करीत होतो. त्याकाळी पालखी सोहळ्याची बातमी वृत्तपत्रात क्वचित यायची. तीही आळंदीचे प्रस्थान, पुण्यातील स्वागत, वाखरीचे रिंगण आणि आषाढी एकादशीची यांची.
याव्यतिरिक्त पालखी सोहळ्यासाठी आजच्यासारखे वारीच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने कधी भरत नव्हते. क्वचित कुठे तरी सिंगल, डबल कॉलम बातमी लागायची. मी तरुण भारतचे संपादक विवेक घळसासी आणि कार्यकारी संपादक अरविंद जोशी साहेब यांना वारीच्या वृत्तांताबद्दल माहिती दिली. त्यांनाही ती खूप आवडली आणि मी आषाढी वारीच्या सोहळ्यात सहभागी झालो. यामागे माझी पत्नी सौ. चंद्रकला हिनेही मोठी साथ दिली. त्यावेळी घरची परिस्थिती बेताची होती. आपण महिनाभर वारीला गेल्यावर घरच्यांनी काय खायचं, हा प्रश्न होता. परंतु पत्नीने मोठा धीर दिला आणि अशी संधी पुन्हा आयुष्यात येणार नाही. तुम्ही जा वारीला, मी घरचे पाहून घेते असे सांगितले.
डोक्यावर लोखंडी पेटी, अंंथरुणाची वळकटी
१६ जून १९९० माझ्या आयुष्यातील सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस. मी सकाळी साडेपाचच्या पंढरपूर-पुणे या एस. टी. बसने आळंदीकडे मार्गस्थ झालो. सकाळी साडेदहा वाजता पुण्यात उतरलो आणि तेथून सीटी बसने आळंदीला गेलो. त्यावेळी सार्वजनिक वाहनांना एवढी गर्दी नसायची. दुपारी एकच्या सुमारास मंदिरात पोहोचलो. मंदिरात प्रस्थानची तयारी सुरू झाली होती. टाळ मृदंगाच्या गजरात आळंदी नगरी दुमदुमून गेली होती. इंद्रायणीचे स्नान करुन अनेक वारकरी दर्शनासाठी मंदिरात येत होते. माझ्याबरोबर रोजच्या अंथरूण पांघरुणाची वळकटी, एक लोखंडी पेटारा. त्यात रोज लागणारे कपडे आणि लिखाणासाठी लागणारे कागद, तसेच पोस्ट करण्यासाठी पाकिटे ठेवली होती. माझी मंदिरात ना कोणाची ओळख होती, ना ओळखीची दिंडी होती. मी दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना पालखी कधी निघते, त्याचे स्वरुप काय असते, याची माहिती घेत होतो. परंतु फरफेक्ट माहिती असणारे असे कोणीच भेटत नव्हते.
माऊलींच्या प्रस्थानाची लगबग
दुपारी तीननंतर वारकऱ्यांची लगबग सुरू झाली. मी मंदिरातील एका कोपऱ्यात बसून हे सर्व पाहत होतो. सुरुवातीला दोन घोडे (आपण त्यांना अश्व म्हणतो) मंदिरात आले. टाळमृदंगाच्या गजरात त्यांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर एक एक करत दिंड्या मंदिरात आल्या. त्या टाळमृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात देहभान हरपून नाचू लागल्या. हे सुमारे तासभर सुरुच होते. सायंकाळी सहाच्या सुमारास एका पालखीत विराजमान झालेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका मंदिराच्या वीणा मंडपातून बाहेर आल्या. वीणा मंडप, कारंजा मंडप, पंखा मंडप हे आम्ही आज बातमीमध्ये लिहितो.
परंतु त्याकाळी असे काही माहित नव्हते. प्रस्थान झाले एवढेच बातमीमध्ये असायचे. प्रस्थान झाल्यानंतर माऊली गांधीवाड्यात म्हणजे आजोळघरी मुक्कामी थांबले. रात्री बातमी लिहिली आणि जवळच असलेल्या पोष्टात पाकीट बंद करुन टाकली. त्याकाळी फॅक्स, मोबाईल, इंटरनेट अशा काही सुविधा नव्हत्या. रात्रीचा मुक्काम आळंदीतच एका दुकानाच्या आडोशाला केला. पहाटे इंद्रायणीचे स्नान करून डोक्यावर लोखंडी ट्रंक, वळकटी आणि गळ्यात शबनम अडकवून माझा वारीचा पुण्याचा प्रवास सुरू झाला. पुण्यात सोहळ्याचा दोन दिवस मुक्काम असल्यामुळे काही वाटले नाही. पुण्यातील दोन दिवसांच्या बातम्या मात्र पुणे-सोलापूर एसटीने सोलापूरला पाठविल्या.
पुणे ते पंढरपूर धावपळ
नंतर मात्र पुणे ते पंढरपूर ही नुसती धावपळ सुरू झाली. दिवेघाट चढून आल्यावर सासवडला पावसाने झोडपले. निवाऱ्याची कोठे सोय नव्हती. वारकऱ्यांचे तंबू होते, पण कोणाच्या तंबूत झोपणार ही अडचण होती. सततच्या पावसामुळे बातमी लिहिण्याचा काही विषयच नव्हता. हॉटेलमध्ये पुरीभाजी खाल्ली आणि सासवड पोलिस ठाण्याच्या मागे एक सायकलचे दुकान होते, तेथे कट्ट्यावर थोडा विसावलो. लोखंडी पेटी बाजूला ठेवून वळकटी अंथरली आणि आडवा झालो. दिवसभर चालल्यामुळे थकवा आला होता. पडल्या पडल्या कधी झोप लागली कळलेच नाही. रात्री एकच्या सुमारास एका माणसाने मला उठविले. उठ, उठ ही काय झोपायची जागा आहे काय? असा प्रश्न करीत त्याने मला तेथून हाकलून दिले. टिळेकर त्यांचे नाव.
नंतर १९९५-९६ मध्ये याच टिळेकरांची आणि माझी चांगली दोस्ती झाली ती फॅक्स मशिनमुळे. पाऊस बऱ्यापैकी थांबला होता. मी डोक्यावर पेटी घेवून एस. टी. बसस्थानकावर आलो. तेथेही माणसांची गर्दी होती. रात्रभर तशीच जागून काढली आणि दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाला लागलो. असे मजल दरमजल करीत, वारीची माहिती घेत प्रवास सुरू होता. जेथे सोय होईल तेथे बातमी लिहीत होतो. कधी एस. टी. ने तर, कधी पोष्टाने बातमी पाठवीत राहिलो. पालखी सोहळा ज्यावेळी वेळापूरला आला, त्यावेळी स्वर्गसुखाचा आनंद झाला. बरोबरचे सामान घरी टाकले आणि यथेच्छ झोप काढली. दुसऱ्या दिवशी मोजकेच सामान आणि सायकल घेवून वेळापूर ते पंढरपूरचा प्रवास केला आणि वारी पूर्ण केली. वारी पूर्ण झाल्यावर गुरुपौर्णिमेला श्रीधर कुटीत जाऊन प. पू. भाईनाथ महाराजांचे दर्शन घेतले. महाराजांनाही खूप आनंद झाला.
मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता १९९१ची वारी थोडी नियोजनात्मक झाली. वारीच्या बातम्या दुपारच्या जेवणाच्या वेळेसच लिहून त्या पोष्टात किंवा एस. टी. बसने पाठवायला सुरुवात केली. याच सोहळ्यात १९९१ ला बाबूराव चोपदार आणि संतानाना चोपदार यांची ओळख झाली. या ओळखीचा फायदा वारीतील माहिती मिळविण्यासाठी झाला. पुढे पुढे संस्थानमधील विश्वस्तांच्या ओळखी झाल्या.
पालख्यांच्या शासकीय स्वागताची परंपरा
१९९२ ला महसूल प्रशासन आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने धर्मपुरी येथे माऊलींचे, तर नीरा नदीतीरावर जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची परंपरा सुरू झाली. राज्याचे मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना विजयसिंह मोहिते पाटील आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी ही परंपरा सुरू केली. आज सातारा जिल्ह्यातही ही परंपरा सुरू झाली आहे. तेंव्हापासून शासनाने या सोहळ्याला मदत करण्याची भूमिका घेतली. विजयसिंह मोहिते पाटील पुण्याचे पालकमंत्री झाले आणि पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पालखी सोहळ्याचे विश्वस्त, मानकरी यांची विधानभवन, पुणे येथे बैठक सुरू झाली. आज पालखी सोहळ्याच्या आरोग्य, पाणी, गॅस, रॉकेल, वीज, पालखी मार्ग, पालखी तळ या ज्या सुविधा आहेत, त्या देण्याची परंपरा तसेच पालखी मार्गावरील दुपारचा विसावा आणि रात्रीच्या मुक्कामांच्या गावांना शासनाकडून अनुदान देण्याची परंपराही विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे सुरू झाली.
२५ हजारांचा सोहळा गेला लाखावर
१९९५ मध्ये फलटणचे फोटोग्राफर आनंद चिटणीस, सामनाचे बातमीदार संदीप पवार आणि लोकसत्ताचे बातमीदार पोतदार यांची ओळख झाली. ते मोटरसायकलवर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा कव्हर करीत होते. चिटणीस हे स्वतःच्या जीप मधून प्रवास करीत घाटातील, चांदोबाचा लिंब, सदाशिवनगर आणि वाखरीचे रिंगणाचे फोटो काढून पुण्यातील वृत्तपत्रांना देत असत. सोहळा वाढला तो १९९६ मध्ये. १९९६ ला श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा सप्तशताब्दी संजीवन समाधी सोहळा होता. महाराष्ट्रातील प्रत्येक गावांत त्यानिमित्ताने श्री ज्ञानेश्वरी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. तसेच रथामागे आणखी २५ दिंड्याना अधिकृत मान्यता देण्यात आली. १९९५ पर्यंत २५ हजारापर्यंत असलेला हा सोहळा लाखावर गेला आणि या सोहळ्याकडे वृत्तपत्रांचेही लक्ष गेले. याच काळात एसटीडी फोन आणि फॅक्स सारख्या सुविधा उपलब्ध झाल्या. ज्या बातम्या छापून येण्यासाठी लागण्यासाठी दोन-चार दिवस वाट पाहावी लागायची, त्या बातम्या लगेच दुसऱ्या दिवशी छापल्या जाऊ लागल्या. त्यामुळे वारीच्या बातम्यांचे लिखाण करताना एक वेगळाच आनंद मिळू लागला.
१९९६ ला शंकर टेमघरे, दशरथ यादव, श्रीकृष्ण नेवसे, संतोष शेणई, श्रीरंग गायकवाड, दत्ता भोंगळे, अरविंद मेहता, मारुती जैनक, शंकरराव जाधव, सुभाष भांबुरे आदी पत्रकारांची मैत्री झाली आणि वारीच्या लिखाणाला एक नवी धार आली. आमचा एक कटाक्ष होता की, वारीवर टीका टिपण्णी करण्यापेक्षा लोकांपर्यंत सकारात्मक वारी कशी पोहोचेल. सकाळच्या काकडा आरतीपासून ते रात्रीच्या कीर्तन आणि जागरापर्यंत सर्व कार्यक्रम लोकांपर्यंत कसे पोहोचतील. वारीतील विविध खेळ, दिवे घाटातील पालखी सोहळ्याचे वर्णन, रिंगण, धावा, भारुड, नीरा स्नान या विषयांच्या लिखाणाने वारीला वेगळा रंग चढविण्यात प्रसार माध्यमे यशस्वी झाली. वाटचालीतील विविध अभंग, गौळणी या सर्व गोष्टींवर पत्रकारांनी लक्ष केंद्रीत केले. त्यांच्यावर लिखाण केले. यासाठी ते वारकऱ्यांसमवेत चालत राहिले. त्यामुळे हे सर्व शक्य झाले.
त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया वारीच्या क्षेत्रात आला. त्यानंतर वारीचे रुपच पालटून गेले. आज सोशल मीडियासुध्दा वारीत आला आहे . त्यामुळे आजची वारी आणि त्याचे विश्वरुप दर्शन भाविकांना घरबसल्या पाहायला मिळत आहे. हे प्रसार माध्यमांचे मोठे योगदान आहे .
पालखी सोहळा पत्रकार संघाची स्थापना
१९९७ नंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात चालणाऱ्या पत्रकारांची संख्या वाढू लागली. या पत्रकारांची एक संघटना असावी, असा विषय पुढे आला. वारीत चालणाऱ्या पत्रकारांची बैठक १५ मे २००३ मध्ये आळंदीत घेण्यात आली. या बैठकीत पालखी सोहळा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य या नावाने संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेचा आज एवढा विस्तार झाला आहे, की राज्यातील संतांच्या पालखी सोहळ्यासमवेत चालणारे पत्रकार या संघटनेचे सभासद झाले आहेत. या संघटनेमुळे पत्रकारांमध्ये सुसंवाद सुरू झाला. निवास, भोजन यांच्या प्रमुख अडचणी दूर झाल्या. आज पालखी सोहळ्याचे रूप पाहता एकट्या माणसाला सोहळा कव्हर करणे तसे कठीण काम आहे. परंतु पत्रकार संघामुळे एकमेकांना माहिती मिळू लागली, हे सुविधाजनक झाले.
तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे वार्तांकन
२००४ ला मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी पालखी सोहळ्याबरोबर चालणाऱ्या पत्रकारांची बैठक अकलूजला घेतली. बहुतांशी पत्रकार हे माऊलींच्या सोहळ्यात चालायचे त्यामुळे प्रसिध्दीही त्याच सोहळ्याला मिळायच . संत तुकाराम महाराज सोहळाही भाविकांपर्यंत पोहोचावा ही त्यांची भावना होती. त्यांनी ती बोलून दाखविली. २००५ पासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वृत्तपत्रांनीही स्वतंत्र पत्रकार दिले. आज केवळ ज्ञानोबा, तुकोबाच नव्हे, तर राज्यातील सर्वच पालखी सोहळ्यांना चांगली प्रसिध्दी मिळत आहे. त्यामुळे वारकरी सांप्रदाय, विचारही वाढीस लागला आहे.
तुकोबारायांचा सोहळा आला आळंदीला
२००७-०८ हे जगतगुरू संत तुकाराम महाराजांचे चतु:शताब्दी वर्ष होते. या वर्षात संत तुकाराम महाराज संस्थानने आणि राज्यातील अनेक दिंडीकरी , फडकऱ्यांनी तुकाराम गाथेवर सप्ताह आयोजित केला. २००८ मध्ये आपल्या पत्रकार संघाने संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही संस्थानांमध्ये वाखरीजवळील पेट्रोलपंपावर बैठक घेऊन समन्वय घडवून आणला. परतीच्या प्रवासात संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदी मार्गे देहूला नेला. ज्या संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा १८३५ नंतर कधीच आळंदीला आला नाही, तो सोहळा पत्रकार संघाच्या माध्यमातून २००८ मध्ये आळंदीला आला. त्यावेळी आळंदीकरांनी तुकोबांचे केलेले स्वागत ‘भूतो न भविष्यती’ असे होते.
प्लेगची साथ, चंद्रभागेला आलेला महापूर आणि कोरोनाची दोन वर्षे अशी वारीवरील संकटे सोडली, तर हा सोहळा अखंडीतपणे सुरू आहे. भागवत धर्माचा बंधुभावाचा, एकोप्याचा प्रचार, प्रसार ही भूमिका ठेवून आम्ही आजपर्यंत काम केले आहे. येथून पुढील काळातही करत राहणार आहोत. वारीच्या वाटेवर अनेक लहान मोठे अनुभव आले. त्यामुळे खूप काही शिकता आले. वारीचे वार्तांकन करताना एखाद्या प्रसंगाला अनुसरून अभंग लिहिला, की त्या बातमीला अधिक रंग चढायचा. माझ्या बातमीच्या शिर्षकांनी मला चांगलीच प्रसिध्दी मिळाली.
…अखेर चाफा बोललाच नाही!
ही १९९५ ची घटना आहे. राज्यात सत्तांतर झाले आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर जोशी विराजमान झाले. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेवर आल्याने अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि काही फडकऱ्यांना स्फुरण चढले होते. मुख्यमंत्री जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून श्री विठ्ठलाच्या महापूजेला येणार होते. मुख्यमंत्र्यांनी वारीत चालावं आणि पखवाज वाजवावा, असा काही आग्रह फडकऱ्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी एक वजनाला हलका असा चाफ्याच्या खोडाचा पखवाज बनविला होता. तसेच आपल्या दिंडीमध्ये मुख्यमंत्र्याना संरक्षण म्हणून वारकऱ्यांच्या वेशातील पोलीस घेतले होते. वाखरी ते विसावा पादुका या दरम्यानच्या वाटचालीत मुख्यमंत्र्यांनी वारीत सहभागी व्हावं, असे नियोजन करण्यात आले होते. परंतु सायंकाळी उभे रिंगण संपले तरी मुख्यमंत्री आले नाहीत.
उभ्या रिंगणानंतर मुख्यमंत्र्याचा ताफा सायरन वाजवत विसावा पादुका जवळ आला. ही वेळ म्हणजे पालखी रथातून पादुका काढून त्या शितोळे सरकार यांच्या गळ्यात देण्याची वेळ होती. यावेळी एकच गर्दी उसळली होती. त्याच वेळी वारकरी आमि भाविकांना धक्काबुक्की करत पोलिसांनी मुख्यमंत्री जोशी यांना पालखी रथाजवळ आणले. या गडबडीत मुख्यमंत्र्यांनी कसेबसे दर्शन घेतले आणि ते पुन्हा गाडीकडे निघाले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या दिंडीत चालावे आणि पखवाज वाजवावा ही त्या फडकऱ्यांची इच्छा मात्र पूर्ण झाली नाही. गेल्या चार पाच वर्षांच्या पत्रकारितेचा अनुभव असल्याने मीही बातमीसाठी रथाजवळ होतो. मुख्यमंत्री पखवाज न वाजविताच परत निघून गेले, हे माझ्या लक्षात आले आणि बातमीचे शिर्षक माझ्या डोक्यात आले – …अखेर चाफा बोललाच नाही! संपादकांनी आणि वाचकांनी त्यावेळी केलेले कौतुक मी आजही विसरलेलो नाही.
भक्तांच्या महापुरे ओसरली चंद्रभागा
ही घटना आहे १९९७ ची. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लोणंद मुक्कामानंतर तरडगावकडे मार्गस्थ झाला आणि राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. दोन दिवसांत इतका पाऊस पडला, की राज्यातील नद्या नाल्यांना पूर आला. चंद्रभागाही दुथडी भरून वाहू लागली. चंद्रभागेचे पाणी पंढरपुरात शिरले आणि यंदा वारी होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. धर्मपुरी येथे पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. त्याचवेळी जिल्हा प्रशासनाने धर्मपुरी पालखी तळावर विश्वस्त आणि मानकरी यांची बैठक घेऊन सोहळा वेळापूरलाच थांबविण्याचा निर्णय घेतला. पालखी सोहळा माळशिरस मुक्कामानंतर वेळापूरकडे मार्गस्थ झाला तरीही पावसाचा जोर कायम होता. सर्व वारकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. प्रत्येक वारकरी पांडुरंगाला पाऊस थांबण्यासाठी साकडे घालत होता. परंतु पाऊस काही थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. वेळापूरला पालखी सोहळा आल्यावर पालखी व्यवस्थापनाने सोहळा पुढे जाणार नाही, असे जाहीर केले आणि वारकरी चिंतेत पडले.
त्यानंतर काय झाले माहीत नाही. पडत्या पावसातच कीर्तन सुरू झाले. निवृत्तीबुवा ठाकूर यांच्या वतीने कीर्तनाची सेवा सुरू झाली. कीर्तनकारांनी कीर्तनासाठी घेतलेला अभंग संपविला आणि जवळपास अर्धा तास ।।ज्ञानबातुकाराम।।चा गजर सुरू केला. या जयघोषात वारकरी पावसाची तमा न बाळगता टाळमृदंगाच्या गजरात इतके तल्लीन झाले, की काही क्षणातच धो धो कोसळणारा पाऊस थांबला. वारकरी आनंदून गेले. त्यानंतर जागर झाला. सकाळपर्यंत चांगलीच उघडीप मिळाली आणि थांबलेला पालखी सोहळा सकाळी आठ वाजता लाखो वारकरी भक्तांच्या समवेत पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. ही सर्व घटना माझ्या डोळ्यासमोर घडल्याने रिंगण किंवा पंढरपूर तालुका प्रवेशाचे शिर्षक न करता मी बातमीला ‘भक्तांच्या महापुरे ओसरली चंद्रभागा’ हे शिर्षक दिले आणि ते खूप गाजले.
पांडुरंगाचा पालखी सोहळा सुरू करण्याचे भाग्य
पत्रकार म्हणून आपण अनेक समाज उपयोगी कामे करू शकतो, याबद्दल माझा अनुभव सांगतो. २०१३ मध्ये मी आमच्या श्री आनंदमूर्ती सेवा मंडळातील वारकऱ्यांना घेऊन महाराष्ट्र परिक्रमा करीत होतो. बुलढाणा जिल्ह्यातील रानअंत्री येथील प. पू. सदगुरु नारायण सरस्वती महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही चिखलीमार्गे जालन्याकडे येत होतो. त्यावेळी रस्त्यावर वारकऱ्यांची गर्दी दिसली. त्यावेळी मी सहज विचारले, काय माऊली पंढरपूरला का? कोणत्या दिंडीत चालता? त्यावेळी त्यांनी संत मुक्ताबाईच्या सोहळ्यात चालतो, असे सांगून सोहळा चिखलीवरून जालन्याकडे निघालो असल्याचे सांगितले. माझ्या सोबतच्या सर्व वारकऱ्यांनी संत मुक्ताबाईंचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही गाडी चिखलीकडे वळवली. काही किलोमीटर अंतर गेल्यावर आम्हाला संत मुक्ताबाईची पालखी दिसली.
गाडीतून उतरून आम्ही मुक्ताबाईंचे दर्शन घेतले आणि माझी पत्रकारिता जागी झाली. मी पालखी सोहळ्याचे प्रमुख कोण आहेत, याची चौकशी सुरू केली. त्यावेळी कुणीतरी हरणे महाराज असल्याचे समजले. आम्ही त्यांचा शोध घेतला. ते रथामागे चालत होते. आम्ही त्यांची भेट घेतली. सोहळ्याविषयी माहिती आणि फोटो घेतले. या भेटीनंतर त्यांची आणि माझी जवळीक वाढली. ते ज्यावेळी आषाढी वारीला पंढरपूरला आले, त्यावेळी त्यांची भेट घेवून मी सोहळ्याविषयी आणखी माहिती घेतली. हा सोहळा इतक्या वर्षे पंढरपूरला येतो, तरीही त्याच्याविषयी कधी वृत्तपत्रात छापून येत नव्हते. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले.
पालखी सोहळ्याचे प्रमुखपद
एकदा मुक्ताईनगरला गेल्यावर संत मुक्ताबाईंच्या अंतर्धान समाधी सोहळ्याविषयी हरणे महाराजांनी माहिती दिली. या सोहळ्याला दरवर्षी संत नामदेव महाराजांच्या पादुका मुक्ताईनगरला येतात. पांडुरंगाच्या पादुका जशा आळंदीला जातात, तशा त्या मुक्ताईनगरला याव्यात यासाठी काहीतरी करा असे ते म्हणाले. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, तुमच्या संस्थानचे पत्र श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीला द्या, मी प्रयत्न करतो. त्यांचे पत्र घेऊन मी पंढरपूरला आलो आणि शिवाजीराव कादबाने साहेबांची भेट घेतली. कादबाने साहेब त्यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी होते. त्यांना मी सर्व माहिती दिली आणि हा सोहळा सुरू करण्याची विनंती केली. त्याचवेळी ती बातमी सर्व वृत्तपत्रांना दिली. ती छापूनही आली आणि कादबाने साहेबांनी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांच्याशी चर्चा करून संत मुक्ताबाईंच्या अंतर्धान समाधी सोहळ्याला श्री पांडुरंगरायाच्या पादुका पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याचा कार्यक्रम तयार करायला मला सांगितले. या सोहळ्याचे तुम्हीच पालखी सोहळा प्रमुख आहात, असे सांगितल्यावर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मी सोहळा निघण्यापूर्वी त्याचे नियोजन करण्यासाठी दौरा केला.
करमाळा, अहमदनगर, नेवासा, औरंगाबाद, सिल्लोड, जामनेर, भुसावळ, वरणगाव, मुक्ताईनगर, मलकापूर, बुलढाणा, चिखली, जालना, अंबड, बीड, वाशी, बार्शी, कुर्डुवाडी या गावांचा दौरा केला. सोहळ्याचा मार्ग, सकाळची न्याहरी, दुपारचा नैवेद्य, सायंकाळचा विसावा आणि रात्रीचा मुक्काम या सर्वांची जय्यत तयारी केली. २०१४ मध्ये आमच्या श्री आनंदमूर्ती सेवा मंडळाचा रथ, पालखी आणि वारकरी घेवून मी श्री पांडुरंगाच्या पादुका घेवून मुक्ताईनगरकडे मार्गस्थ झालो. जे नियोजन केले होते, त्यापेक्षा खूप सुंदर सोहळा झाला. वर्षानुवर्षे पंढरपूरला येऊनही श्री पांडुरंगरायाचे दर्शन ज्या विठ्ठलभक्तांना होत नव्हते त्यांना या सोहळ्यामुळे श्री पांडुरंगाचे दर्शन झाले. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला खूप समाधान वाटले. इतक्या वर्षे केलेली पत्रकारिता आणि श्री पांडुरंगरायाची सेवा फळाला आली. आज हा सोहळा दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात तो फार मोठा होईल असे मला वाटते.
– सूर्यकांत भगवान भिसे
संस्थापक अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ
मोबाईल – ९८२२०२३५६४
अतिशय सुंदर अनुभव. वारीचा प्रवास या माध्यमातून अनुभवता आला. वाचताना भारावून गेलो.
खुप सुंदर माहिती दिली. पालखी सोहळ्याला वैभव प्राप्त करून देण्यात पालखी सोहळा पत्रकार संघाचा मोलाचा वाटा आहे. असेच कार्य संघाकडून घडो ही माऊली चरणी प्रार्थना..