विष्णूच्या दोन, एक महिषासूरमर्दिनी;

तसेच पादुका आणि दोन छोट्या मूर्ती

पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिरात शुक्रवारी (दि.३१) आढळलेल्या तळघरात रेखीव दगडी मूर्तींचा पुरातन ठेवा सापडला आहे. विष्णूच्या दोन, तर महिषासुरमर्दिनी, तसेच पादुका आणि दोन छोट्या मूर्ती आढळून आल्या आहेत. तसेच या तळघरात मातीच्या बांगड्या आणि काही नाणीही सापडली आहेत.

गेले दोन महिने विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. यामुळे मंदिराला सुमारे ७०० वर्षांपूर्वीचे रूप पुन्हा प्राप्त झाले आहे. आज (दि. ३१) विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ कामगारांना दोन दगडी फरशा खचल्याचे दिसले. त्याखाली पोकळी असल्याचे आढळले. दगड काढल्यानंतर त्या ठिकाणी एक मोठे तळघर असल्याचे दिसले. मंदिर समितीतील अधिकारी आणि पुरातत्त्व विभागाचे वास्तु विशारद तेजस्विनी आफळे यांनी पाहणी केल्यानंतर ते तळघर पाच ते दहा फूट असल्याचे दिसून आले. या भुयारात उतरण्यासाठी पायऱ्याही आहेत. भुयारात उतरून पाहिल्यानंतर तेथे ५ बाय ५ च्या चेंबरमध्ये एकूण सहा वस्तू आढळल्या.

त्यामध्ये तीन मोठ्या दगडी मूर्ती, दोन छोट्या मूर्ती आणि एक पादुका सापडल्या. त्यासोबत मातीत बांगड्यांचे तुकडेही आढळले. तसेच जुनी नाणीही सापडली. एक मोठी मूर्ती व्यंकटेशाची, दुसरी महिषासूर मर्दिनीची, तर तिसरी चतुर्भुज विष्णूची आहे. या मूर्तीचे दोन्ही हात कमरेवर आहेत. त्यापैकी एक हात उपडा आहे. अशा प्रकारची विठ्ठलाची पंचधातूंची मूर्ती पैठणला संत एकनाथ महाराजांच्या घरात आहे. तिला ‘विजयी विठ्ठल’ असे म्हणतात. अर्थात तिला दोनच हात आहेत.

या मूर्ती साधारणपणे सोळाव्या शतकातील असाव्यात, असा प्राथमिक अंदाज पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी व्यक्त केला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, अभ्यासक आणि महाराज मंडळींच्या उपस्थितीत तळघरातील या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या.

विठ्ठलरुक्मिणी मंदिराचे संवर्धन आणि जिर्णोद्वाराचे काम पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रस्तावित कामांपैकी बाजीराव पडसाळी, गर्भगृह, सोळखांबी सभामंडप आणि इतर ठिकाणी काम सुरू आहे. या कामामुळे १५ मार्चपासून विठुरायाचे चरणस्पर्श दर्शन बंद होते. ते आता दोन जूनपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी मंदिरात हे तळघर सापडले आहे. त्यामुळे मंदिरात आणखी काही तळघरे आहेत का, याचाही शोध पुरातत्त्व विभागाकडून घेतला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *