नाशिकच्या आहेर दाम्पत्याला
मिळाला मुख्यमंत्र्यांसोबत मान
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या आषाढी एकादशीची महापूजा आज (दि. १७) पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली. नाशिकच्या सटाणा तालक्यातील अंबासन गावचे बाळू आहेर आणि आशाबाई आहेर यांना वारकरी म्हणून विठ्ठलाच्या पूजेचा सन्मान मिळाला.
संतांच्या पालख्यांसोबत आषाढी एकदशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे. पहाटे सव्वा दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठ्ठलाच्या महापूजेसाठी सपत्नीक दाखल झाले.
प्रथेप्रमाणे रांगेत आलेले नाशिकचे वारकरी बाळू आहेर यांनाही सपत्नीक महापूजेचा मान मिळाला. सटाणा तालुक्यातील अंबासन गावातील अहिरे दाम्पत्य गेल्या १६ वर्षांपासून पंढरीची वारी करत आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असे संपूर्ण कुटुंब महापूजेसाठी उपस्थित होते.
यंदाच्या आषाढी वारीसाठी कालच (दि. १६) दहा लाखांहून अधिक वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. ही गर्दी आज दिवसभरात अजून वाढणार आहे. श्री विठ्ठलाच्या चरणस्पर्श दर्शनासाठी जवळपास २२ तास, तर मुखदर्शनासाठी दोन ते तीन तासांचा अवधी लागत आहे.
दरम्यान, आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाला परिधान केला जाणारा खास पोषाख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यांच्या कुटुंबियांनी अर्पण केला आहे. हा खास पोशाख बेंगलुरूमध्ये बनविण्यात आला आहे. विठुरायाला भगव्या रंगाची मखमली अंगी बनविण्यात आली आहे. त्यावर भरजरी हस्त कलाकुसर आहे. देवाच्या पोशाखात बेंगलोरी सिल्कचे मुलायम सोवळ्याचा समावेश आहे. रुक्मिणी मातेलाही अतिशय उंची भरजरी सिल्कची नऊवारी साडी खास बनवून बेंगलोर येथून आणण्यात आल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
पंढरपुरात दाखल झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजार समितीमधील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. तसेच पंढपुरात येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी द्रुतगती मार्गावर बस अपघातात जखमी झालेल्या ४५ वारकऱ्यांची नवी मुंबईतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन विचारपूस केली.
आषाढी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावरील दोन्ही शिखरे, संत नामदेव महाद्वार, संत ज्ञानेश्वर मंडप, संत तुकाराम भवन या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतून तुळशी पंढरी नावाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
मंगळवारी (दि १६) आषाढ शुध्द दशमीला प्रमुख संतांच्या पालख्यांनी पंढरपुरात प्रवेश केला. संत नामदेव महाराजांचे वंशज श्री विठ्ठलदास नामदास महाराज आणि परिवाराने प्रथेप्रमाणे सर्व संतांच्या पालखी रथांचे स्वागत केले. संत मुक्ताबाई, संत सोपान काका, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानराज माऊली आणि त्यांच्यामागे इतर सर्व संतांच्या पालखी रथांनी पंढरपुरात प्रवेश केला.
चंद्रभागेत स्नान करण्यासाठी वारकऱ्यांनी चंद्रभागेतिरी एकच गर्दी केली आहे. महाराष्ट्र शासनाकडून नमामी चंद्रभागा हा प्रदूषममुक्त चंद्रभागेचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात सर्वाधिक प्राधान्य वारकऱ्यांच्या सुरक्षेला देण्यात आले आहे. पंढरपुरात भाविकांना येण्यासाठी पाच हजार एसटी बसची सुविधा देण्यात आली आहे. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागा भाविकांनी फुलून गेली आहे.
शहरातील मठ धर्मशाळा या ठिकाणी भाविक मुक्कामी आहेत. तसेच रस्त्याकडेला राहुट्या, तंबू टाकून भाविक भजन, कीर्तन, हरिनामाचा जयघोष करत आहेत. शहरातील लॉज, भक्त निवासही हाऊसफुल्ल झाले आहेत. मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. चंद्रभागा नदीत स्नान, पुंडलिकरायाचे दर्शन घेवून भाविक दर्शन रांगेत उभे राहत आहेत.