मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची
आषाढी यात्रेच्या तोंडावर घोषणा
मुंबई : राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूरला आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
टोल माफीसाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे, तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे, याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
अधिक गर्दीसाठी नियोजन करा
कोरोनामुळे गेले दोन वर्षे वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनाला जाता आले नव्हते. त्यामुळे यंदा पंढरपूरला आलेल्या वारकऱ्यांची संख्या मोठी असेल. त्यासाठी योग्य नियोजन करावे. स्वच्छता, आरोग्य, वाहतूक व्यवस्था, औषधे, साफसफाई, रस्ते सफाई या सुविधांबाबत काळजी घ्यावी. मोबाईल टॉयलेट चेंजिंग रुम्स, रुग्णवाहिका यासाठी गरज असल्यास बाहेरुन मदत घ्या, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या सोयी सुविधांबाबत तसेच वारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या आपल्या निवासस्थानातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंढरपूर यात्रेच्या तयारीबाबत माहिती घेतली.
पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी नगरविकास खात्याकडून वाढीव निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.
तिरुपती बालाजीच्या धर्तीवर विकास
पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासाचा कायमस्वरूपी आराखडा होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी देशातील तिरुपती बालाजी तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा समोर ठेवून पंढरपूर तीर्थक्षेत्राचा कायमस्वरूपी विकास करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
प्रशासनाने संपूर्ण वारी मार्गावर आणि पंढरपूर शहरात चांगली स्वच्छता ठेवावी. आरोग्य सुविधांसह साथीच्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा ठेवावा, यात्रा परिसर खड्डे विरहित व्हावा यासाठी तातडीने युद्ध पातळीवर नियोजन करा, तसेच वारकऱ्यांसाठी बसेसची संख्या वाढवा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.