विदर्भातील संत मांदियाळीतील
सद्गुरू श्री मुंगसाजी महाराज
यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील परमहंस श्री सद्गुरू मुंगसाजी महाराज यांचा आज ६४वा वैकुंठ गमन दिवस.
शिरडीत बंधु माझा म्हणे आडकोजी।
दुजा भाऊ शेगावात नांदतो अजी।।
तिजा ताजुद्दीन अमुचा मित्र जिव-भाव साचा।
मुंगसाजी बंधू चवथा आमच्या भुजी।।
असे संत तुकडोजी महाराजांनी विदर्भातील संत मांदियाळीत सद्गुरू मुंगसाजी महाराजांचे स्थान आणि त्यांच्याशी असलेले नाते सांगितले आहे.
दिंड्यांनी गजबजले धामणगाव देव
मुंगसाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त राज्य आणि परराज्यातील हजारो भाविक आज धामणगाव देव येथे दाखल झाले आहेत. विदर्भातील विविध ठिकाणांहून महाराजांच्या दर्शनासाठी हरिनामाचा नामगजर करत आलेल्या दिंड्या धामण गावात दाखल झाल्या आहेत. कोरोनामुळे गेले दोन वर्षे बंधने आलेला हा पुण्यतिथी सोहळा पुन्हा गजबजला आहे. यातील घाटंजी आणि यवतमाळ येथून जाणारा पालखी सोहळा महत्त्वाचा मानला जातो. सद्गुरू मुंगसोजी महाराजांमुळे विदर्भात विठ्ठलभक्ती आणि आणि वारकरी संप्रदायाची थोरवी वाढली. दिंडी सोहळ्यांची संख्या वाढली.
धामणगाव देव हे मुंगसाजी महाराजांचे जन्मस्थान आणि तपोभूमी. मुंगसाजी महाराजांचा जन्म ४ सप्टेंबर १८६३ रोजी गोकुळ अष्टमीच्या रात्री १२ वाजता झाला. त्यांच्या आईचे नाव गमाई, तर वडिलांचे नाव विक्रमजी होते. मुंगसाजी महाराजांचे लहानपणीचे नाव तुळजाजी होते. मुंगसाजी महाराज १५ वर्षाचे असतांनाच महाराजाचे वडील विक्रमजी वैकुंठवासी झाले. विक्रमजीनंतर तुळजाजीवर घर सांभाळण्याची जबाबदारी आली. तुळजाजी आपला लहान भाऊ अर्जुन यांच्या सोबतीने शेतीची कामे करू लागले. आईच्या आग्रहाखातर तुळजाजी नाईलाजाने वयाच्या १७ व्या वर्षी (सन १८८०) लग्नास तयार झाले. पण मुंगसाजी महाराज प्रपंचात कधीच रमले नाहीत.
कठोर अनुष्ठान
घरची परिस्थिती हलाखीची होती. कर्ज वाढत होते. अशातच १८८५ च्या श्रावणी पोळ्यामध्ये मुंगसाजी महाराजांना मानाच्या तोरणाखाली बैल उभा करण्यास विरोध केला गेला. ही त्यांच्या गोष्ट मनाला खूप लागली आणि बैल तेथेच सोडून तुळजाजींनी मारोतीच्या पारावर अन्नपाण्याचा त्याग करून नजर स्थिर करून अनुष्ठान मांडले. सात दिवसांनी काहीही न बोलता जंगलात निघून गेले. नऊ महिन्यांनी ते जंगलातून बाहेर आले तेव्हा पूर्णपणे ईश्वरमय झाले होते. त्यानंतर आईच्या सूचनेवरून १८८८मध्ये वयाच्या २५व्या वर्षी मातीच्या बुरुजावर (तुळजाजी गढी) माणसांचा वावर नसलेल्या, झाडे झुडपे वाढलेल्या साप, मुंगुस, विंचू , सरडे यांचा मुक्त संचार असलेल्या या जागी त्यांनी १२ वर्षे तपश्चर्या केली. १९३५ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सालबर्डी येथे भव्य महारुद्र यज्ञाचे आयोजन केले होते. या ठिकाणी मुंगसाजी महाराजांनी हजेरी लावली होती. मुंगसोजी महाराजांनी अनेकांना श्री विठ्ठल लाचे दर्शन घडविले. त्यांच्या अनेक लीला भक्त सांगतात.
भेदभाव करू नका, संतांची संगत धरा
“भेदभाव करू नका. पशूहत्या करू नका. कुणी कुणाचा सखा नाही, सोयरा नाही. मार्गात खूप संकटे आहेत. म्हणून साधुसंतांची संगत धरावी आणि वर्तन चांगले ठेवावे. मनुष्य जन्म भेटला आहे तेव्हा परमार्थाची खरी कमाई करावी”, असा उपदेश मुंगसाजी महाराज करत. फाल्गुन शुद्ध सप्तमी २६ फेब्रुवारी १९५८ बुधवार रोजी मुंगसाजी महाराजांनी सहज प्राणायाम साधत मुंबईत चर्चगेट येथे देह ठेवला. महाराजांनी मद्रासी अम्मा यांच्या मांडीवर डोके ठेऊन अर्धा कप चहा घेतला आणि उर्वरित चहा इतरांना वाटून दिला. आता ‘राम कृष्ण हरी’ नाम घ्यावे, असे उपस्थित भक्तांना सांगितले. सर्व भक्तगण कीर्तनात मग्न असताना महाराजांनी महानिर्वाण केले.
मुंबईतील वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमीत महाराजांच्या पार्थिवावर दाहसंस्कार करण्यात आला.या ठिकाणी मुंगसाजी देवाचे समाधी मंदिर आहे. मुंगसाजी महाराजांच्या धामणगाव देव या तीर्थक्षेत्र विकासासाठी ३९ कोटी रुपयांचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. त्यातून या ठिकाणी अनेक कामे सुरू आहेत.
लवकरच आपल्या सेवेत येत आहे – www.dnyanbatukaram.com