सोहळ्यात १०० दिंड्यांचा सहभाग;

शुक्रवारी बुलडाण्यामध्ये मुक्काम

मुक्ताईनगर : तब्बल ३१५ वर्षांची वारीची आणि अध्यात्मिक परंपरा असलेल्या मुक्ताईच्या पालखीने आज (दि. १८) आषाढी वारीसाठी कोथळी येथील जुन्या मंदिरातून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवले.

मुक्ताईच्या पालखी प्रस्थानानिमित्त सकाळपासूनच कोथळी गावातील मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी मुक्ताईला खजुराची आरास करण्यात आली होती. आमदार गिरीष महाजन यांच्या हस्ते मुक्ताईच्या पादुकांचे पूजन करुन या पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. त्यानंतर ही पालखी मार्गस्थ झाली. यावेळी स्थानिक आमदार चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.

चांदीच्या नऊ किलोच्या पादुका
जुने मंदिर कोथळी येथून प्रस्थान होऊन श्रीक्षेत्र मुक्ताईनगर नवीन मंदिर येथे पालखी विसावणार आहे. १९ जून रोजी सकाळी पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे. यंदा प्रथमच पालखी सोहळ्यासाठी मुक्ताईच्या नऊ किलो चांदीच्या नवीन पादुका आणि चांदीचा चोप तयार करण्यात आला आहे. तसेच रथावर चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. रथाची साफसफाई, पॉलिश करून पाच क्विंटल फुलांनी रथ सजवला आहे.

आज मलकापुरात मुक्काम केल्यानंतर आदिशक्ती मुक्ताईची पालखी नियोजित मार्गानुसार मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. २१) रोजी पालखी बुलडाण्यात पोहोचणार आहे. येथील जुनागाव परिसरातील श्री हनुमंताचे मंदिर आणि नगरपरिषदेच्या शाळेत पालखीतील भक्तगणांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी (दि. २२) सहकार विद्या मंदिर येथे महाप्रसाद झाल्यानंतर पालखी मार्गस्थ होणार आहे.

दरवर्षी, आदिशक्ती मुक्ताबाईची पालखी बुलडाण्यातून जाते. २१ जूनच्या मुक्कामानंतर २२ जूनला सकाळी सहकार विद्या मंदिरच्या सभागृहात भक्तजणांच्या महाप्रसादाची व्यवस्था ‘बुलडाणा अर्बन’चे राधेश्याम चांडक यांच्या पुढाकारातून करण्यात आली आहे. दसरखेड येथे साठे परिवार आणि गावकऱ्यातर्फे होणाऱ्या आदरातिथ्याचा स्वीकार केल्यावर पालखीचा पहिला मुक्काम मलकापूर येथे राहणार आहे. तेथील मराठा मंगल कार्यालय येथे पालखी आणि वारकरी विसावा घेणार आहे. मलकापूर येथील आदिशक्तीचे निस्सीम भक्त पानसरे परिवार यजमान आहेत.

सर्वाधिक लांबीचा सोहळा
यावर्षी पालखी सोहळ्यामध्ये जवळपास १०० दिंड्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. मुक्ताईंचा पालखीसोहळा पंढरपूरमध्ये सर्वप्रथम प्रवेश करणारा पालखी सोहळा आहे. आदिशक्ती मुक्ताबाई यांची पालखी वाखरी येथे सामोरे गेल्याशिवाय इतर संत पंढरपूर मध्ये प्रवेश करत नाहीत, एवढा मान आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याला आहे. तसेच सर्वात आधी निघणारा, सर्वात लांब पल्ल्याचा आणि तब्बल सात जिल्ह्यांमधून प्रवास करणारा पालखी सोहळा म्हणून आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याची ख्याती आहे.
सात जिल्ह्यांतून प्रवास
मध्य प्रदेशातील बरामपुर जिल्ह्यातील नाचणखेडा येथील राजेश प्रकाश पाटील यांच्या बैलजोडीला रथ ओढण्याचा मान मिळाला आहे. गत ११ वर्षांपासून हा मान कायम आहे. पंढरपूरकडे जाताना पालखी सात जिल्ह्यांतून प्रवास करते. तसेच यंदा मुक्ताईच्या पालखी रथात चांदीच्या ९ किलो वजनाच्या पादुका व चोपदराची काठी सुद्धा चांदीची असणार आहे. त्याचप्रमाणे यावर्षी १०० दिंड्या पायी वारी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, जुने मुक्ताई मंदिराचे व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे यांनी ही माहिती दिली आहे.

प्रवासाचे अंतर झाले कमी
आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या मार्गांत मागील वर्षी ४० वर्षांनंतर बदल करण्यात आला होता. पूर्वी ३४ दिवसांत ७५० किलोमीटर अंतर पायी चालून ही पालखी पंढरपुरात दाखल व्हायची. नवीन रचनेत आडमार्ग आणि फेऱ्यांचा प्रवास कमी केला आहे. त्यामुळे हा सोहळा मागील वर्षी २४ दिवसांत महामार्गाने ६०० किलोमीटर अंतर चालून आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी पंढरपुरात पोहोचला होता.

असे आहेत मुक्काम –

१८ जून- मूळ मंदीर प्रस्थान

१९ जून- (दुपारी मुक्काम) दसरखेड, (रात्री मुक्काम) मलकापूर

२० जून- (दुपारी मुक्काम) शेलापुर, (रात्री मुक्काम) मोताळा

२१ जून- (दुपारी मुक्काम) राजुर, (रात्री मुक्काम) बुलढाणा

२२ जून- (दुपारी मुक्काम) बुलढाणा, (रात्री मुक्काम) येळगाव

२३ जून- (दुपारी मुक्काम)हातनी, (रात्री मुक्काम)चिखली

२४ जून- (दुपारी मुक्काम) बेराळा फाटा, (रात्री मुक्काम) भरोसा फाटा

२५ जून- (दुपारी मुक्काम)अंढेरा फाटा, (रात्री मुक्काम) देऊळगाव मही

२६ जून- (दुपारी मुक्काम) गणपती मंदिर,आळंद, (रात्री मुक्काम) देऊळगाव राजा

२७ जून- (दुपारी मुक्काम)वाघरूळ, (रात्री मुक्काम) कन्हैया नगर जालना

२८ जून- (दुपारी मुक्काम)गोरक्षण,जालना, (रात्री मुक्काम) काजळा फाटा

२९ जून- (दुपारी मुक्काम) शेवगाव पाटी, (रात्री मुक्काम) अंबड

३० जून- (दुपारी मुक्काम) शहापूर (दाढेगाव), (रात्री मुक्काम) वडीगोद्री

१ जुलै- (दुपारी मुक्काम) शहागड, (रात्री मुक्काम) गेवराई

२ जुलै- (दुपारी मुक्काम) गढी (जय भवानी साखर कारखाना),(रात्री मुक्काम) पाडळसिंगी

३ जुलै- (दुपारी मुक्काम) नामलगाव फाटा, (रात्री मुक्काम) बीड माळीवेस (हनुमान मंदिर)

४ जुलै- (दुपारी मुक्काम) बीड माळीवेस (हनुमान मंदिर), (रात्री मुक्काम) बीड (बालाजी मंदिर)

५ जुलै- (दुपारी मुक्काम) बीड अहिर वडगाव, (रात्री मुक्काम) पाली

६ जुलै- (दुपारी मुक्काम) उदंड वडगाव, (रात्री मुक्काम) वानगाव फाटा

७ जुलै- (दुपारी मुक्काम) चौसाळा, (रात्री मुक्काम) पारगाव

८ जुलै- (दुपारी मुक्काम) येसवंडी, (रात्री मुक्काम) वाकवड

९ जुलै- (दुपारी मुक्काम) भूम, (रात्री मुक्काम) भूम

१० जुलै- (दुपारी मुक्काम) आष्टा, (रात्री मुक्काम) जवळा

११ जुलै- (दुपारी मुक्काम) वाकडी, (रात्री मुक्काम)शेंद्री

१२ जुलै- (दुपारी मुक्काम) वडशिंगे, (रात्री मुक्काम) माढा

१३ जुलै- (दुपारी मुक्काम) वडाची वाडी, (रात्री मुक्काम)आष्टी

१४ जुलै- (दुपारी मुक्काम) रोपळे, (रात्री मुक्काम) पंढरपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *