वारीच्या वाटेवर अनुभवला
बंधुभाव आणि सलोखा
संत आणि सूफी परंपरेच्या संगमाबद्दल खूप ऐकलं होतं. देहूतील अनगडशाह बाबा आणि तुकोबारायांची मैत्री, त्यांचे दखनी भाषेतील अल्ला देवे अल्ला दिलावे। अल्ला दारू अल्ला खिलावे।। अशा अभंगांनी लेखांची, भाषणांची सुरुवात केली होती. पण वारी प्रत्यक्षात अनुभवली आणि या अभंगांचा गहिरा अर्थ कळत गेला.
– हलीमा कुरेशीज्ञानोबारायांची अलंकापुरी म्हणजेच आळंदी टाळ, वीणा, मृदंगाच्या गजरात दुमदुमून गेली होती. इंद्रायणीच्या घाटावर वैष्णवांचा मेळा जमला होता. कुठे आपल्याच तंद्रीत अभंग गात बसलेला वारकरी, तर कुठं रंगलेलं भारूड. सगळं वातावरणच प्रफुल्लित करणारं. २०१५ मध्ये संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकोबाराय या दोन्हीही पालखी सोहळ्यांच्या वार्तांकनाला गेले, तेव्हा हे वातावरण अनुभवत होते…
संत आणि सूफी परंपरेच्या संगमाबद्दल खूप ऐकलं होतं. देहूतील अनगडशाह बाबा आणि तुकोबारायांची मैत्री, त्यांचे दखनी भाषेतले अल्ला देवे अल्ला दिलावे। अल्ला दारू अल्ला खिलावे।। अल्ला बिगर नही कोय। अल्ला करे सोहि होय।। अशा अभंगांनी लेखांची, भाषणांची सुरुवात केली होती. पण वारी प्रत्यक्षात अनुभवली आणि या अभंगांचा गहिरा अर्थ कळत गेला.
तसं महाविद्यालयात शिकत असताना एनएसएस अर्थात राष्ट्रीय सेवा योजनेतून मी पहिल्यांदा वारीत चालत सहभागी झाले होते. समाजात एकमेकांविषयी निर्माण केला जाणारा संशय, द्वेष नाहिसा करायचा असेल, तर वारीची परंपरा जपली पाहिजे, हे मनोमन वाटायचं.
त्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याची संधी पत्रकार म्हणून मिळाली. ‘आयबीएन-लोकमत’मध्ये टीव्ही पत्रकार म्हणून काम करताना वारीला गेले आणि लाखो लोकांपर्यंत ही बंधुभाव, प्रेमाची परंपरा पोहोचविण्याची संधी मला मिळाली. ‘भेटी लागे जीवा’ या वारीवरील अर्ध्या तासाच्या कार्यक्रमातून मी वारीतील अनेक पैलू दाखवण्याचा प्रयत्न केला.
वारी करतेय म्हणून आळंदी आणि देहू या दोन्ही देवस्थानांनी माझा सत्कार केला. त्यामुळं वारीचं कव्हरेज करण्याचा उत्साह दुणावला. पुण्यात दोन दिवस तुकोबांची आणि ज्ञानोबांची पालखी विसावते. नाना पेठ, भवानी पेठ परिसरात वारकऱ्यांची पुणेकर भक्तीभावाने सेवा करतात. निवडुंग्या विठोबा मंदिर परिसरात साखळीपीर तालीमीतर्फे वारकऱ्यांची सेवा सुश्रूषा केली जाते. तिथेच अब्दुल रज्जाक चाचा वारकऱ्यांच्या सेवेत मग्न असलेले दिसतात.
डोक्यावर जाळीदार टोपी घातलेल्या, वाटचाल करून थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांना मालीश करणाऱ्या चाचांशी गप्पा मारल्या. वारकऱ्यांच्या या मालीश सेवेसाठी ते खास हैदराबादहून वैशिष्ट्यपूर्ण मसाजचं तेल आणतात. ‘बीबीसी मराठी’साठी काम करतानाही मी चाचांची स्टोरी केली होती. चाचांना विचारलं होतं, सध्या समाजात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होतात, द्वेष निर्माण केला जातो आहे. अशा वातावरणात तुम्ही वारकऱ्यांचे पाय चेपून देत आहात, तुम्ही याबद्दल काय विचार करता? क्षणाचाही विलंब न लावता चाचा म्हणाले, ‘‘माझ्या डोक्यात हा हिंदू, तो मुस्लिम असे विचार येतच नाहीत. आणि असा विचार करणारा माणूसही नाही आणि मुस्लिमही नाही. आपण सगळेच एकाच ईश्वराची लेकरं आहोत. कोणी त्याला अल्लाह म्हणतं, तर कोणी भगवान. आपल्या सर्वांचं रक्तही लालच आहे.’’
मला इस्लामचा, वारीचा, मानवतेचा अर्थच या त्यांच्या उत्तरातून कळला. वारकऱ्यांमध्ये चाचा लोकप्रिय आहेत. आळंदी, देहूपासून चालत येणाऱ्या वारकऱ्यांना पायदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी अशा तक्रारी सतावतात. आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेल्या खास तेलानं आणि आपल्या जादुई बोटांनी चाचा वारकऱ्यांचा ‘दुख-दर्द’ पळवून लावतात.
वारीच्या वाटेवरचा दुसरा बंधुभाव मी यवत इथं अनुभवला.
तेथील मंदिरात वारकऱ्यांसाठी पिठलं बनवलं जातं, तर मस्जिदमध्ये भाकरी बनविल्या जातात. वारकरी गावात आले, की त्यांना प्रेमानं जेऊ घातलं जातं. तसंच गावातील घराघरांतून देखील भाकरी आणून दिल्या जातात. मग ते कुटुंब हिंदू असो वा मुस्लिम. प्रत्येकजण वारकऱ्यांच्या सेवेत दंग असतो. हा एकोप्याचा संदेश वारीच्या संपूर्ण प्रवासात जागोजागी पाहायला मिळाला.
वारीतील महिलांना स्वातंत्र्य अनुभवताना पाहून फार बरं वाटलं. वारीच्या काळाच संसाराच्या व्यापातून बाहेर पडून त्या भारुड, कीर्तनात रंगून जातात. मात्र या महिला वारकऱ्यांना उघड्यावर अंघोळ करावी लागते. त्यांच्या आरोग्याच्याही समस्या असतात. शासनाकडून फिरत्या स्वच्छतागृहांची सुविधा दिली जाते, पण ती अपुरी पडताना दिसते. वारी मार्गावरील गावातदेखील महिला वारकऱ्यांसाठी अंघोळ, चेंजिंग रुम असणं गरजेचं आहे. तसेच सॅनिटरी नॅपकिन, डिस्पोजल युनिटही उपलब्ध करणं गरजेचं आहे. या संदर्भात यंदा राज्य महिला आयोगाने विचार केलाय याचा आनंद आहे. ते अजून मोठ्या प्रमाणात व्हायला हवं. वारी दरवर्षी मला वेगळी वाटते, आणखी समजत जाते. त्यामुळं मी दरवर्षी वारीची वाट पाहत असते.
(हलीमा कुरेशी सकाळ वृत्तपत्र समूहात पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.)