पंढरपूरच्या आषाढी वारीमधील
प्रमुख आणि मानाच्या पालख्या
अनंत तीर्थांचे सार असलेला सावळा विठुराया भूवैकुंठ पंढरीत युगे अठ्ठावीस कटेवर कर ठेवून उतावीळपणे भक्तांची वाट पाहतो आहे. तर, त्याच्या भेटीसाठी आसुसलेले वारकरी ऊन, वारा, पाऊस वगैरेंची तमा न बाळगता विविध संतांच्या पालख्यांसोबत पंढरीची वाट चालत आहेत. गेली अनेक शतके हे सुरू आहे. आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो पालख्या पंढरीला येतात. त्यातील ज्याला मानाच्या किंवा प्रमुख म्हणतात, अशा पालख्यांची ही थोडक्यात करून दिलेली ओळख…
– बाळासाहेब बोचरे
आषाढी पायी वारीला राज्यभरातून सर्वात दूरवरून म्हणजे मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथून संत मुक्ताबाईंची भक्तीगंगा पंढरीला निघते. जवळपास तेवढेच अंतर असलेला शेगावीचा राणा संत गजानन महाराज, तर त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ यांच्या भक्तीगंगा मार्गस्थ होतात. याच दरम्यान अमरावती जिल्ह्यातून कौंडिण्यपूर या माता रुक्मिणीच्या माहेराहून तिची पालखी पंढरीला आणली जाते. ४०० वर्षाहून अधिक परंपरा असलेली संत एकनाथ महाराज यांची पालखी पैठणहून निघते. त्याच दिवशी देहूहून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची भक्तीगंगा पंढरपूरसाठी निघते. त्याच्या दुसऱ्या दिवशी संत ज्ञानेश्वर माऊली पंढरीसाठी निघतात.
ज्येष्ठ वद्य द्वादशी हा दिवस म्हणजे संत निवृत्तीनाथांचा पुण्यतिथीचा दिवस. या दिवशी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवड येथे दाखल झालेली असते. याच दिवशी संत सोपानकाकांची भक्तीगंगाही पंढपूरकडे मार्गस्थ होते. याच दिवशी संत योगीराज चांगावटेश्वर यांचीही पालखी सासवड येथूनच मार्गस्थ होते.
संत नामदेवांचे योगदान
भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यात विविध संत सज्जनांचे योगदान असले तरी त्यात नामदेव महाराजांचे नाव अगोदर घ्यावे लागेल.
ऐका पंढरीचे महिमान। राऊळे तितुके प्रमाण।।
तेथील तृण आणि पाषाण। देव जाणावे।।
या अभंगातून त्यांनी पंढरीचा महिमा वर्णिला आहे.
वाराणसी चालिजा एक मासा। गोदावरी एक दिवसा।।
पंढरी पाऊल परियेसा। ऐसा ठसा नामाचा।।
या अभंगातून त्यांनी पंढरीच्या पायी वारीचे महत्व विषद केले आहे. संत नामदेवांनी आपल्या फडाच्या माध्यमातून देशाच्या विविध भागात भागवत धर्माचा प्रसार केला. आजही पंजाब प्रांतात त्यांचे भक्त आहेत. आजही तेथे भागवत सप्ताह केला जातो. महाराष्ट्रातील कीर्तनकारांना त्यात सन्मान दिला जातो.
नामदेवरायांनी मराठी भाषेची नाळ पंजाबशी जोडली. म्हणूनच घुमान येथे अलिकडेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले. दामूशेटी आणि गोणाबाई यांच्या पोटी जन्मलेले नामदेव हे श्री विठ्ठलाचे लाडके भक्त होते. तसेच ते पंढरपूरचे वतनदारही होते. पांडुरंगा, तुझ्या दर्शनाला येणाऱ्या भाविकाचे पाय माझ्या मस्तकी पडावेत हीच मागणी त्यांनी पांडुरंगाकडे केली आणि पांडुरंगाच्या चरणाशी समाधी घेतली. आजही पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाताना नामदेव पायरीवरुनच जावे लागते. अनेक भक्त नामदेव पायरीवर डोके ठेवायला मिळाले तरी धन्य मानतात.
संत नामदेवांच्या वंशजांनी नामदास बांधवांनी पंढरपूरला येणाऱ्या संतांच्या पालख्यांचे स्वागत करण्याची परंपरा सुरू केली. वाखरी येथून सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरकडे निघतात, तेव्हा संत नामदेवांची पालखी सर्व संतांच्या स्वागतासाठी पंढरपुरातून इसबावीपर्यंत नेली जाते. इसबावीपासून सर्वात पुढे संत नामदेव, त्यानंतर संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज अशा सात पालख्यांचा मेळा दशमीला रात्री पंढरीत दाखल होतो. हा सोहळा पाहताना डोळे दिपून जातात.
आळंदी वारीची परंपरा
संत नामदेवांच्या वंशजाच्या वतीने कार्तिक महिन्यात आळंदीला पालखी सोहळा नेला जातो. ५० दिंड्यासह कार्तिक पौर्णिमेला सोहळा पंढरपुरातून निघतो आणि आठ दिवसात आळंदीला पोहोचतो. आळंदीत आठ दिवस मुक्काम असतो. त्यामध्ये एक दिवस देहूला भेट दिली जाते. आळंदीत हजेरी मारूतीजवळ संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव यांच्या पालख्या एकत्र ठेवल्या जातात आणि तेथे मानकऱ्यांच्या हजेऱ्या होतात.
संत मुक्ताईंची वाट दूरची
पंढरपूरला येणाऱ्या पालख्यांपैकी सर्वात दुरून येणारी पालखी ही संत ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण संत मुक्ताईंची आहे. ही पालखी परंपरा १७१० मध्ये राम महाराज आणि शाम महाराज दुधगावकर या बंधूंनी सुरू केली. गेल्या ३०० वर्षांहून अधिक काळ ही भक्तीगंगा दरवर्षी ६५० किलोमीटरची पायी वाटचाल करत पंढरीला येते. मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथून निघालेली ही खान्देशी भक्तीगंगा मध्यप्रदेश, खान्देशसह विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात हरिनामाची पेरणी करत ३३ दिवसांंत पंढरीला पोहोचते. या भक्तीगंगेत खान्देशसह मध्यप्रदेशातीलही वारकरी सहभागी असतात.
दरवर्षी ज्येष्ठ शुध्द पंचमीला पालखीचे प्रस्थान होते. सुरुवातीला पालखी खांद्यावरुन नेली जात होती. अलिकडे पादुका रथातून नेल्या जातात. संत मुक्ताबाई संस्थान हे विश्वस्त मंडळ असून या संस्थामार्फतच सध्या पालखी नेली जाते. सर्व मानकऱ्यांची नेमणूक संस्थानच्या वतीने केली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी सद्गुरु सखाराम महाराज इकोरेकर आणि देहूकर फडाच्यावतीने परंपरेची किर्तने होतात. सोहळ्यात सुमारे ५००० वारकरी असतात.
आजोबा नातीची भेट
पंंढरपूरला येताना बीड येथे संत मुक्ताबाई यांचे आजोबा गोविंदबुवा यांची समाधी आहे. तेथे आजोबा आणि नातीची भेट घडविली जाते. गेवराई येथे अश्वाचे गोल रिंगण होते. मुक्ताईनगर येथून निघाल्यानंतर पहिला मुक्काम सातोडला होतो. त्यानंतर भालेगाव (रण), मलकापूर, शेलापूर, टाकरखेड, मोताळा, येळगाव, चिखली, खंडाळा मकरध्वज, मेरा बु, भरोसा, देऊळगाव मही, देऊळगाव राजा (जि. बुलडाणा), जालना, काजळा फाटा, अंबड, वाडीगोद्री, (जि. जालना), गेवराई, नामलगाव फाटा, बीड, पाली मोरगाव, चौसाळा (जि. बीड), वालवड, भूम, जवळा निजाम, (जि. उस्मानाबाद) शेंद्री, माढा आणि आष्टी (जि. सोलापूर) येथे शेवटचा मुक्काम करून पादुकांना चंद्रभागा स्नान करवून पालखी पंढरीत दाखल होते. दशमीला पालखी इसबावी येथे संतांच्या भेटीला जाते. तिथे संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव आणि संत सोपानकाकांची भेट होते. मुक्ताईंना बंधूंकडून मानाची साळीचोळी मिळते.
निवृत्तीनाथांचा ४५० किलोमीटरचा टप्पा
संत ज्ञानेदव माऊली, संत सोपानकाका आणि संत मुक्ताबाई या चार भावंडांचे ज्येष्ठ बंधू संत निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथून निघते. तेथे संत निवृत्तीनाथांची समाधी आहे. संत निवृत्तीनाथ यांच्या नावाने त्र्यंबकेश्वर येथे ट्रस्ट असून देवस्थानचा कारभार ट्रस्टमार्फतच चालतो. मात्र निवृतीनाथांची पालखी पंढरपूरला नेण्याचा मान गोसावी आणि बेलापूरकर घराण्याकडे आहे.
माझ्या वडिलाची मिरासी गा देवा। तुझी चरण सेवा पांडुरंगा।। या अभंगाप्रमाणे वंशपरंपरेचे पालखी काढली जाते. बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील भानुदास महाराज बेलापूरकर, पुजारी वामन महाराज गोसावी आणि शिवराम महाराज कोनांबेकर यांनी १८३७ मध्ये संत निवृत्तीनाथांच्या पादुका पंढरपूरला नेण्याची परंपरा सुरू केली. ज्येष्ठ पौर्णिमेला पालखीचे प्रस्थान होते. नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतून सुमारे साडेचारशे किलोमीटरचा प्रवास २५ दिवसांत करून पालखी पंढरपुरात दाखल होते. परतीचा हाच प्रवास २० दिवसांत केला जातो. १००च्या वर दिंड्या आणि ७५ हजारापर्यंत वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात.
तीन जिल्ह्यांचा प्रवास
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या पालखीचा पहिला मुक्काम सातपूर येथे, तर दुसरा मुक्काम नाशिक पंचवटी मार्केट यार्डात असतो. त्यानंतर पळसे, लोणारवाडी, खंडाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी (जि. अहमदगर) बेलापूर, राहुरी, डोंगरगण, अहमदनगर, साकत, घोगरगाव, मिरजगाव, चिंचोली, कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर (जि. सोलापूर), कंदर, दगड अकोले, करकंब, पांढरेवाडी, चिंचोली या ठिकाणी मुक्काम करत पालखी सोहळा पंढरपुरात दाखल होतो.
संत गजाजन महाराज पालखी
विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या श्री गजानन महाराजांची पालखी शेगाव (जि. बुलडाणा ) येथून पंढरपूरला येते. या पालखीचाही दूरचा प्रवास असल्याने संत मुक्ताईच्या पालखीनंतर चार दिवसांनी या पालखीचे प्रस्थान होते. या पालखी सोहळ्याचे संपूर्ण शिस्तबद्ध नियोजन श्री गजाजन महाराज संस्थानच्या वतीने केले जाते. अखंड जनसेवेचे व्रत घेतलेल्या या संस्थानकडून वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांचा खर्च केला जातो. वारकऱ्यांची अगोदर नोंदणी केली जाते. वैद्यकीय चाचणी झाल्यानंतरच वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकतो. सुमारे १५०० ते २००० पर्यंत वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. या सोहळ्यात हत्ती, घोडे, रथ असा ऐश्वर्यवंत लवाजमा असतो. ‘गण् गण् गणात बोते’ असा जयघोष करत सोहळा अत्यंत शिस्तीत आणि आखीवरेखीव पद्धतीने वाटचाल करत असतो. पालखीचा कार्यक्रम एकूण ५९ दिवसांचा असतो. ३३ दिवसांत ७२५ किलोमीटरचे अंतर पार करत पालखी पंढरपुरात दाखल होते. शेगावहून निघाल्यानंतर पहिला मुक्काम पारस येथे, तर दुसरा मुक्काम भौरद येथे करून पालखी अकोल्याला येते. त्यानंतर वाडेगाव, पातूर, श्री क्षेत्र डाव्हा, श्री क्षेत्र शिरपूर जैन, म्हसला पिन, रिसोड (जि. वाशिम), सेनगाव, डिग्रज, जवळा बाजार (जि. हिंगोली), श्री क्षेत्र त्रिधारानंतर पालखी परभणीला मुक्कामी येते. त्यानंतर दैठणा, गंगाखेड, परळी थर्मल, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, बोरीसावरगाव, (जि. बीड) येथून कळंब (जि. उस्मानाबाद ) येथे मुक्कामी येते. उस्मानाबाद जिल्ह्यातला दुसरा मुक्काम तेरणा साखर कारखाना येथे होतो. त्यानंतर उस्मानाबाद, श्री क्षेत्र तुळजापूर आणि उळेनंतर पालखी सोलापूर मुक्कामी येते. दोन दिवस सोलापुरात मुक्काम केल्यानंतर तिऱ्हे, माचणूर, श्री क्षेत्र मंगळवेढामार्गे पालखी पंढरपुरात दाखल होते.
परतीला मुक्काम कमी आणि वेग जास्त ठेवत २३ दिवसांतपालखी परत शेगावला येते. परतीला पहिला मुक्काम करकंब येथे होते. त्यानंतर कुर्डूवाडी, उपळाई स्टेशन, बार्शीचा मुक्काम करुन भूम (जि. उस्मानाबाद ) येथे पालखी मुक्कामी जाते. त्यानंतर चौसाळी (जि. बीड), गेवराई, शहापूर येथे मुक्काम करून पालखी जालना येथे मुक्कामी जाते. त्यानंतर सिंदेखेड राजा, बीबी, लोणार, मेहकर, जानेफळ, शिर्ला नेमाने, आवार आणि खामगाव येथे मुक्काम करून पालखी शेगावला येते. यंदा पालखी सोहळ्याचे ५३ वे वर्ष आहे.
संत एकनाथांची वाट खडतर
माझ्या वडिलांचे दैवत। कृपाळू पंढरीनाथ।।
पंढरीला जाऊ चला। भेटू विठ्ठल रखुमाई।।
अशी भावना व्यक्त करत पैठण (जि. औरंगाबाद) येथून संत एकनाथ महाराजांची पालखी निघते. या पालखीचा रस्ता हा आडवळणाचा अन् डोंगरदऱ्यांचा आहे. गावोगावी संताचा सहवास लाभावा या उद्देशाने निघालेला नाथ महाराजांचा सोहळा हा अवघड वाटचाल करत पंढरपूरला येतो. एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज हे पंढरपूरची वारी करायचे. त्यानंतर त्यांचे पुत्र चक्रपाणी महाराज, त्यानंतर सूर्यनारायण महाराज आणि त्यानंतर संत एकनाथ महाराज यांनी वारी परंपरा सुरू ठेवली. शके १५२१ मध्ये नाथ महाराजांचे देहावसान झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव हरीपंडीत गोसावी यांनी नाथ महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन ही परंपरा सुरू ठेवली. त्यानंतर राघोबा गोसावी, रघुनाथ गोसावी यांनी ही परंपरा चालवली. रघुनाथ गोसावी यांच्यानंतर त्यांच्या पत्नी जानकीबाई यांनी ही परंपरा चालविली. जानकीबाई यांनी पादुका पालखीतून नेण्यास सुरुवात केली. त्यानंतर नारायणबुवा गोसावी यांच्यानंतर लक्ष्मीबाई गोसावी यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. त्यांनी रघुनाथबुवा पालखीवाले यांना दत्तक घेतले. तेव्हापासून रघुनाथबुवा पालखीवाले ही परंपरा चालवत आहेत.
हो सोहळा ४२५व्या वर्षाकडे वाटचाल करत आहे. यंदाचे ४२३ वे वर्षे आहे. ज्येष्ठ वद्य सप्तमीला पालखीचे प्रस्थान होते. १९ दिवसांत २७५ किलोमीटरची वाटचाल करत पालखी दशमीला पंढरपुरात दाखल होते. पैठणहून निघाल्यानंतर पहिला मुक्काम चणकवाडी येथे होतो. त्यानंतर हादगाव, लाडजळगाव, कुंडलपारगाव, मुंगुसवाडे, राक्षसभुवन, रायमोह, पाटोदा, दिघोळ, खर्डा, दांडेगाव, अनाळे, परांडा, बिटरगाव, कुर्डू,अरण, करकंब, होळे, शिरढोण येथे मुक्काम करून पालखी दशमीला पंढरपुरात दाखल होते. परतीला बार्डी, निमगाव (टें), साडे, देवीचा माळ, हाळगाव, जामखेड, डोंगरकिणी, गोमळवाडे, टेंभूर्णी, वेळी, शिंगोली येथे मुक्काम करून पैठणला दाखल होते. पंढरपुरातील नाथ चौकातील जहागीरदार वाड्यात पालखीचा मुक्काम असतो. आषाढ शुद्ध चतुदर्शीला श्री विठ्ठल मंदिरात नाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते. पौर्णिमेचा कालाही विठ्ठल मंदिरातच केला जातो.
तुकोबारायांनी केला कळस
भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन पंढरीची वारी परंपरा वाढविण्यात ।।ज्ञानबातुकाराम।। या जयषोघाने मोठी जादू केली आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या संतांबद्दल बोलताना ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालासे कळस।। असे संत बहिणाबाईंनी म्हटले ते उगीच नाही. म्हणूनच वारकऱ्यांनी भजनाच्या रुपात या दोन्ही संतांना आणि पर्यायाने संपूर्ण समाजाला ।।ज्ञानबातुकाराम।। या जयघोषात एकत्र ठेवले आहे. संत तुकाराम महाराज हे आळंदीमार्गे पंढरपूर वारी करायचे. त्यानंतर संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका एकत्रितपणे पंढरपूरला नेण्याची परंपरा तुकाराम महाराज यांचे चिरंजीव नारायण महाराजांनी १६८० मध्ये सुरू केली. ती परंपरा आजतागायत सुरू आहे. संत तुकाराम महाराजांचे वंशज देहूच्या मोरे मंडळींकडून हा सोहळा चालविला जातो. १८३५ पासून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्या स्वतंत्रपणे आळंदीहून निघू लागला.
देहू येथून ज्येष्ठ वद्य सप्तमीला हा सोहळा निघतो. त्याच दिवशी पालखी आळंदीला मुक्कामी जात असे. अष्टमीला माऊली आणि तुकाराम महाराज अशा दोन्ही संतांच्या पादुका एकत्रितपणे पंढरपूरला निघत असत. नंतर तुकाराम महाराजांचा सोहळा आळंदीला न येता स्वतंत्रपणे पंढरपूरला जाऊ लागला. सध्या तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम देहूतील इनामदार वाड्यातच असतो. त्यानंतर आकुर्डीचा मुक्काम केल्यानंतर पालख्या पुण्यात पोहोचतात. संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात तर, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला असते.
नवमी आणि दशमीचा मुक्काम करून एकादशीला दोन्ही पालख्या पंढरपूरकडे निघतात. हडपसर येथून माऊलींची पालखी सासवडकडे वळते, तर तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर मार्गाने लोणी काळभोर येथे मुक्कामी जाते. त्यानंतर यवत, वरवंड, बारामती, इंदापूर अकलूज मार्गे तोंडले बोंडले येथे पुन्हा या दोन पालख्या एकत्र येतात. पालखी मार्गाने वाडीकुरोली, भंडीशेगावरून पालख्या नवमीला वाखरीत एकत्र येतात. दशमीला सर्व पालख्या मिळून पंढपुरात दाखल होतात. या सोहळ्यात ठिकठिकाणी अश्वांची रिगणे होतात. बारामतीजवळी काटेवाडी येथे धनगर समाजाच्यावतीने तुकाराम महाराजांच्या पालखीला मेंढ्यांची प्रदक्षिण घातली जाते. त्याला मेढ्यांचे रिंगण म्हणतात.
माऊलीभक्तीचा ओघ वाढे
विविध संतांच्या पालख्या पंढरपूरला नेण्याची परंपरा त्यांच्या वंशजांनी पुढे चालू ठेवली असली, तरी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा भक्तांनी सुरू केला आणि भक्तांनीच वाढविला आहे. लहान वयातच समाधी घेतलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा गुरू हैबतबाबा आरफळकर या भक्ताने सुरू केला.
देहूचे नारायण महाराज यांनी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका एकत्रपणे पंढरपूरला नेण्याची परंपरा कित्येक वर्षे चालविली. परंतु नंतर त्यांच्या वंशजांमध्ये मतभेद झाल्याने तुकाराम महाराजांचा सोहळा आळंदीला जाणे बंद झाला. १८३१ मध्ये केवळ तुकाराम महाराजांच्याच पादुका पंढरपूरला नेल्या गेल्या. याचे गुरू हैबत बाबा यांना अतीव दु:ख झाले. सैनिकांचा जिल्हा अशी ख्याती असलेल्या सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे हैबत बाबा हे ग्वाल्हेरचे शिंदे सरकार यांच्या पदरी सरदार होते. पुढील वर्षी कसल्याही परिस्थितीमध्ये माऊलींच्या पादुका पंढरपूरला न्यायच्याच असा निश्चय त्यांनी केला. आणि वर्षभरात बरीच जुळवाजुळव केली. त्यांनी शिंदे सरकारांकडे आपला मनोदय बोलून दाखविला. शिंदे सरकारांनीही त्यांना मदत केली. शिंदे सरकारांच्या सांगण्यावरून अंकली (जि. बेळगाव) येथील शितोळे सरकार यांनी सोहळ्यासाठी घोडे आणि तंबूची सोय केली. खंडोजीबुवा भापकर आणि सुभानजी शेडगे यांच्यासह हैबतबाबांनी १८३२ मध्ये ज्येष्ठ वद्य अष्टमीला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका डोक्यावर घेऊन पंढरीची वारी सुरू केली.
सोहळ्यात ५०० हून अधिक दिंड्या
गुरूर हैबतबाबांनी आळंदीकर आणि मल्लाप्पा वासकर यांच्यासह पहिली दिंडी निर्माण केली. त्यानंतर दुसरी दिंडी खंडोजी बाबांची, तर तिसरी दिंडी सुभानजी शेडगे यांची, असा क्रम लावला. काही काळाने पादुका रथामधून जाऊ लागल्या. माऊलींचे वैभव वाढू लागले. माऊलींसाठी चौरीवाले, अब्दागिरी, भालदार, चोपदार, सनई, चौघडा, शिंगवाले, भोई असे विविध मानकरी तयार झाले. कालांतराने दिंड्यांची संख्याही वाढली. आजघडीला ५०० च्या वर दिंड्या या सोहळ्यात सहभागी होतात. रथापुढे २७ दिंड्या आणि शितोळे सरकारांचे अश्व असतात. हा कारभार पाहण्यासाठी संस्थान निर्माण केले असले, तरी पालखी सोहळा हा मानकरी आणि भक्त यांच्यामार्फतच परंपरेने चालविला जातो. दरवर्षीच्या सोहळ्यासाठी घोडे, तंबू आणि नैवेद्य शितोळे सरकार यांच्याकडून दिला जातो.
ज्येष्ठ वद्य अष्टमीला निघालेला हा सोहळा आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी या ठिकाणी मुक्काम करत १७ दिवसांत २७५ किलोमीटरचे अंतर पार करत पंढरीत दाखल होतो. वाटचालीत अश्वांची गोल आणि उभी रिंगणे होतात.
संत सोपानकाकांच्या सोहळ्यात बंधूभेट
संत निवृत्ती, संत ज्ञानदेव, संत सोपान, संत मुक्ताबाई या चार भावंडांपैकी धाकटे बंधू संत सोपानकाका यांची पालखी सासवड (जि. पुणे) येथून निघते. सध्या संत सोपानकाका संस्थान कार्यरत असले, तरी मंदिराची देखभाल, पूजा, पालखी काढणे यासाठी वंशपरंपरेने गोसावी हे वहिवाटदार आहेत. ज्ञानेश्वर माऊली गोसावी आणि पंढरपूरचे धोंडोपंत दादा अत्रे यांनी १९०४ मध्ये संत सोपानकाकांची पालखी सुरू केली. त्यातील पहिली दिंडी ही सासवडकरांची, तर दुसरी दिंडी ही खरवळकरांची असते.
ज्येष्ठ वद्य द्वादशीला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला मुक्कामी असते. त्याच दिवशी संत निवृत्तीनाथांची पुण्यतिथी असते आणि या मुहूर्तावर संत सोपानकाकांची पालखी सासवडहून पंढरपूरकडे प्रस्थान करते. यानिमित्ताने दोन्ही संतांच्या भेटीचा सोहळा घडल्याचे समाधान वाटते. या सोहळ्यात शंभरावर दिंड्या असतात. सासवडहून निघाल्यानंतर पहिला मुक्काम पांगारे, येथे असतो. त्यानंतर मांडकी, निंबूत, सोमेरश्वरनगर, कोऱ्हाळे बुद्रुक, माळेगाव बुद्रुक, बारामती, लासुर्णे, निरवांगी,अकलूज, बोंडले, भंडीशेगाव, वाखरी येथे मुक्काम करून पालखी दशमीला पंढरपुरात येते. या सोहळ्यातही अश्व आणि बकऱ्यांची रिंगणे होतात.
माळशिरस तालुक्यातून पंढरपूर तालुक्यात टप्पा येथे पालखी सोहळे प्रवेश करतात. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालख्या शेजारी उभ्या करुन दोन्ही बंधूंच्या भेटीचा भावनिक सोहळा घडविला जातो. पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गावर संत सोपानकाकांचे मंदीर आहे. तिथे पालखीचा पाच दिवस मुक्काम असतो. गोपाळकाल्यानंतर पालखी परतीला निघते.
संत सोपानकांकाची सोपानदेवी
संत सोपानकाकांनी सोपानदेवी हा ग्रंथ लिहिला असून ७१३ ओव्यांचा हा ग्रंथ प्रसिध्द आहे. त्याचबरोबर ११७ अभंगाचा सोपानदेव गाथा, शिवाय हरिपाठ प्रसिध्द आहे. सध्या ॲड. गोपाळमहाराज गोसावी हे सोहळ्याचे अध्यक्ष असले, तरी त्यांचे वय झाल्याने त्यांचे पुत्र त्रिगुण महाराज गोसावी हे सर्व व्यवस्था पाहतात.
संत चांगा वटेश्वरांची पालखी
सासवड (जि. पुणे) येथे ज्येष्ठ वद्य द्वादशीला संत सोपानकाका यांच्याबरोबर संत चांगावटेश्वर यांचाही पालखी सोहळा प्रस्थान करतो. या सोहळ्याला सुमारे १२५ वर्षाची परंपरा आहे. संत नामदेवांनी चांगावटेश्वर यांच्याबद्दल एका अभंगात उल्लेख केला आहे.
वटेश्वर वृत्तांत सांगितला सकळा।
पूर्वी आमच्या स्थळा याच क्षेत्री।।
येथुनिया वाट जातसे पातळा।
उघडली शिळा समाधीची।।
आसन मनोहर मृगछळांवर।
पाहती ऋषीश्वर आनंदाने।।
सोपान वटेश्वर करितो एकांत।
कळले मनोरथ नामा म्हणे।।
यावरून संत सोपानकाका आणि संत चांगावटेश्वर यांच्या संबंधावर प्रकाश पडतो.
नागरपूरचे विठोबा भोसले यांनी चांगा वटेश्वर पालखी सुरू केली. भोसले हे डोळ्याने अंध होते. त्यांना आंधळे महाराजही म्हटले जायचे. त्यांनी ही परंपरा सुरू केली. मोजक्या वारकऱ्यांसह ते चांगावटेश्वराची पालखी पंढरपूरला घेऊन जाऊ लागले. त्यानंतर लातूरचे स्वातंत्र्यसेनानी नागोजीरावबाबा बहादुरे यांनी हा सोहळा पुढे चालविला. कालांतराने यातील मानकरी आणि संबधितांनी विश्वस्त मंडळाची स्थापना केली. सासवड येथील श्री लक्ष्मीनारायण मंदीर ट्रस्टच्या वतीने सध्या सोहळा काढला जातो. सध्या जनार्दन तुकाराम वावळे हे सोहळा चालवत आहेत. २४ दिंड्यासह रथ आणि अश्व अशा लवाजम्यासह सुमारे पाच हजार वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. काटेवाडी येथील ज्ञानदेव कृष्णा काटे यांचा मानाचा अश्व सोहळ्यासाठी असतो. यवतचे बबन महाराज दोडगे यांची बैलजोडी वंशपरंपरेने असते. शशिकांत जगताप हे चोपदार आहेत. नीलेश हरिभाऊ शिंदे हे पुजारी असून भागवत भूषणकर हे सेवेकरी आहेत. सासवडहून निघाल्यानंतर पारगाव नेमाणे, बोरीऐंदी, यवत, पाटस, रावणगाव, भिगवण, इंदापूर, अकलूज, वेळापूर असा मुक्काम करत पालखी पंढरपूरला येते. रावणगाव येथे बकऱ्याचे रिंगण, तर शेटफळ, इंदापूर, उघडेवाडी, बाजीराव विहीर, विसावा येथे अश्वांची रिंगणे होतात.
आरत्या रचणारे संत निळोबाराय
विविध संतांच्या आरत्यांची रचना करणारे किंवा आरत्याचे निर्माते म्हणूनच संत निळोबाराय यांची ख्याती आहे. दररोज नवनवीन रचना करणे हा त्यांचा छंदच होता. त्यांनी पंढरीच्या पांडुरंगाबरोबरच संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आदींच्या आरत्यांची रचना केली आहे. देहूचे नारायण महाराज यांनी जेव्हा संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची एकत्रित पायी वारी सुरू केली, त्या वारीत निळोबारायही सहभागी होते. नारायण महाराज यांनी १६८५ मध्ये हा सोहळा सुरू केला असला, तरी १७०९ पासून निळोबाराय यांनी आषाढी वारी सुरू केली. याशिवाय ते माघ वारीलाही पंढरपूरला जात असत. फाल्गुन वद्य तृतीया १७५३ ला ते पिंपळनेर (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथे समाधिस्थ झाले.
त्यानंतर त्यांच्या वंशजांनी संत निळोबाराय यांची माघ वारी सुरू ठेवली, परंतु आषाढी वारी खंडीत झाली होती. १९७२ साली समाजसेवक अण्णा हजारे आणि रामदास बुवा मनसुख यांनी पुढाकार घेऊन संत निळोबाराय सेवा मंडळाची स्थापना केली. तसेच निळोबाराय ट्रस्ट आणि सेवा मंडळ मिळून पायी आषाढी वारी सुरू केली. त्यामध्ये अण्णा हजारे स्वत: पायी चालत जाऊ लागले. अवघ्या पाच वर्षांत या पायी वारीला पालखी सोहळ्याचे स्वरुप आले. सध्या या सोहळ्यात ६१ दिंड्या सहभागी होतात. सध्या संत निळोबाराय यांचे वंशज, नवव्या पिढीतील ह. भ. प. गोपाळ महाराज मकाशीर हे सोहळ्याचे प्रमुख आहेत. ज्येष्ठ कृष्ण दशमीला पिंपळनेर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून पालखीचे प्रस्थान होते. रात्री मुक्काम पिंपळनेर येथेच राहतो. त्यानंतर पहिला मुक्काम राळेगणसिध्दी येथे होतो. त्यानंतर देवदैठण, बेलवंडी, श्रीगोंदा, टाकळी कडेवळीत, भांबुरा, स्वामी चिंचोली (ता. दौंड), डिसकळ, लोणी देवकर, सरडेवाडी, टेंभूर्णी (ता. माढा), परिते, करकंब, गुरसाळे, येथे मुक्काम करून सोहळा नवमीला पंढरीत दाखल होतो. वाटेत या सोहळ्यात अश्वांची रिंगणे होतात.
माहेरातून रुक्मिणीमातेची पालखी
पंढरीत कटेवर कर ठेवून उभ्या असलेल्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी विविध संतसज्जनांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी येत असताना श्री विठ्ठालाची अर्धांगिणी रुक्मिणीमातेची पालखीही तिच्या माहेरहूनही पंढरपूरला येते. कौंडिण्यपूर (ता. तिवसा, जि. अमरावती) येथून रुक्मिणीमातेची पालखी येत असून, या पालखीला सव्वाचारशे वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. यंदाचे ४२८ वे वर्ष आहे. नुकत्याच झालेल्या उत्खननात कौंडिण्यपूरमध्ये ५०० वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत. त्यामुळे ही पुरातन नगरी असणायावर शिक्कामोर्तब झाले आहे.
विदर्भाचा राजा भिमकाची कन्या असलेल्या रुक्मिणीमातेचे भगवान श्रीकृष्णाने हरण केल्याचे आपण पुराणात ऐकले आहे. ते स्थळ कौंडिण्यपूरच असल्याचे सांगितले जाते. या नगरीतून ४२८ वर्षापूर्वी संत सदाराम महाराजांनी पंढरीची पायी वारी सुरू केली. तेव्हापासून ही वारी अखंडपणे सुरू असून वरचेवर सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढत आहे. सध्या सोहळ्यात ४०० पर्यंत वारकरी सहभागी असतात. ज्येष्ठ वद्य चतुर्थीला पालखीचे प्रस्थान होते. ४० दिवसांत ८०० किलोमीटरची वाटचाल करत पालखी नवमीला पंढरपुरात दाखल होते. वाटेत भांडेगाव (जि. हिंगोली) येथे दोन दिवस मुक्काम असतो. यानिमित्त मोठी यात्रा भरते. पंढरपुरात गोपाळपूर रोडवरील रुक्मिणीमाता धर्मशाळेत पालखीचा मुक्काम असतो.
पावन सरिता वशिष्टे तिरी। नांदे रुक्मिणीसवे श्रीहरी।।
या काव्यपंक्तीप्रमाणे वर्षातून तीन दिवस पांडुरंग आपली सासुरवाडी कौंडिण्यपुरात वास्तव्यास असतात, अशी भावना आहे. सद्गुरु सदाराम महाराजांना वयोमानानुसार वारी करणे अशक्य झाल्याने पांडुरंगाने त्यांना शुध्द प्रतिपदेला कौंडिण्यपूरला येण्याचा दृष्टांत दिला. त्यानुसार प्रतिपदेला दहिहंडीचा मोठा उत्सव होतो. कौंडिण्यपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान नावाने ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून, पालखीची व्यवस्था ट्रस्टमार्फतच केली जाते.
मंगळवेढे भूमी संतांची
पंढरपूर नगरीपासून अवघ्या २० किलोमीटरवर मंगळवेढे नगरी असून, या भूमीला संतांची भूमी असं म्हटलं जातं. या नगरीत संत दामाजी पंत, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा या संतांच्या समाध्या आहेत. मंगळवेढ्यातून संत दामाजीपंतांची पालखी पंढरपूरला जाते. परंतु केवळ एक मुक्काम करून पालखी वाखरीत दाखल होते आणि इतर संतांच्या पालख्यासोबत दशमीला पंढरीत दाखल होते.
(लेखक ‘लोकमत’मध्ये पत्रकार आहेत.)