
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी
घेतला पालखी मार्गाचा आढावा
पुणे : पालखी मार्गावर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढेल यादृष्टीने प्रयत्न करावेत. शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच कीर्तन, अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करावे, असे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (दि. ८) येथे दिले.
वनभवन येथे हरित पालखी मार्ग अनुषंगाने आयोजित बैठकीत मंत्री मुनगंटीवार बोलत होते. बैठकीस प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) सुनीता सिंग, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, पुणे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक राहुल पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, हरित वारी अभियानाचे संयोजक ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे उपस्थित होते.
पंढरपूर श्री विठ्ठल मंदिर देवस्थानच्या जागेवर वृक्ष लागवडीबाबत देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्यास वनविभागामार्फत सामंजस्य करार करून तेथे वृक्ष लागवड करता येईल. तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे काम करता येईल, असेही मंत्री मुनगंटीवार यांनी सुचवले.
महाराष्ट्राचे हरित आच्छादन २ हजार ५५० चौरस किलोमीटरने वाढले असल्याचे तसेच कांदळवन संवर्धनाचेही देशात उल्लेखनीय कार्य महाराष्ट्रात झाले असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, वृक्ष लागवड आणि संवर्धनात लोकसहभाग वाढविण्यासाठी नियोजन करावे. पालखी मार्गावर वनविभागाचे कायमस्वरूपी होर्डिंग्ज करावेत. त्यावर वृक्षाशी, पर्यावरणाशी संबंधित अभंग, ओव्या लिहाव्यात. या मार्गावर असलेल्या मोठ्या वृक्षांच्या रोपवाटिकांची यादी करावी.
तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी महत्वाच्या वृक्षांची लागवड आणि त्यांची माहिती देण्याची व्यवस्था झाली पाहिजे. पालखी मार्गावरील गावात वृक्षलागवडीबाबत प्रबोधन करण्यास इच्छुक असणाऱ्या प्रबोधनकार, प्रवचनकार, कीर्तनकार मार्गावर यादी करावी. त्यांना जुलैपूर्वी असे प्रबोधन करण्यासाठी मानधन देण्याची व्यवस्था करता येईल. देवस्थानने निर्माल्य आणि ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खते निर्मितीसाठी यंत्रे बसवावीत. शासकीय जागांवर देवराया निर्माण करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
आळंदी देवस्थानच्या ७५ एकर जागेवर ‘इको टुरिझम’मधून वृक्ष उद्यान निर्मितीचा प्रस्ताव
यावेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख आणि ॲड. विकास ढगे पाटील यांनी देवस्थानच्या ७५ एकर जागेवर वनविभागाने वृक्ष लागवड तसेच उद्यान निर्मिती करावी असा प्रस्ताव दिल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने इको टुरिझममधून तसेच अटल घन वन योजनेतून वृक्ष उद्यान निर्मितीसाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश वनमंत्र्यांनी दिले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पालखी मार्गावर लावण्यात येणारी झाडे निकषानुसार उंची योग्य वयाची असावीत. तसेच त्यासाठी झाडे लावतानाच ट्री गार्ड लावावेत. वृक्षलागवडीमध्ये सरकारच्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
प्रारंभी भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यबाबत तयार केलेल्या कॉफी टेबल बुकचे आणि निवृत्त मुख्य वनसंरक्षक एस. एस. पाटील यांनी तयार केलेल्या वनवार्ता या बातमीपत्राचे प्रकाशन करण्यात आले.
हरित वारी अभियान संयोजकांच्या वतीने हरित पालखी महामार्ग बाबत सादरीकरण करण्यात आले. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग २६५ किलोमीटर आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग २५४ किलोमीटरचा आहे. मार्गावर लावण्यात येणाऱ्या झाडांसाठी शास्त्रोक्त पद्धतीने ट्री गार्ड लावावेत. सात मोठ्या पालख्यांच्या रस्त्याचे हरितकरण करायचे आहे. त्या कामात पालखी सोहळा आयोजकांचे सहकार्य घेण्याची संकल्पना आहे, असे सांगण्यात आले.
एनएचएआय चे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी पालखी मार्गांवरील वृक्षलागवडीबाबत सादरीकरण केले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे मुख्य अभियंता राजेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग-राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता संतोष शेलार, संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे आदी यावेळी उपस्थित होते.