अमरावतीच्या गणोरी गावात
आहे मुस्लीम संतांचे मंदिर
वारकरी संतांनी अनेक जातीधर्माच्या लोकांना सोबत घेतलं. विविध जातीधर्मांमधून संत घडविले. वारकरी समतेच्या विचारांचा प्रभाव पडलेल्या अनेक सत्पुरुषांची मंदिरे गावोगावी दिसतात. त्यापैकीच एक म्हणजे, अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील गणोरी गावातील वारकरी मुस्लिम संत परमहंस महंमदखान महाराज.
धर्मानं मुस्लीम असलेले, तरीही वारकरी संत म्हणून नावारूपास आलेले परमहंस महंमदखान महाराज हे मूळचे अमरावतीहून १८ किलोमीटरवर असलेल्या भातुकली तालुक्यातील गणोरी या छोट्याशा गावचे. गावात प्रवेश करताच भव्य प्रवेशद्वाराच्या समोरच महंमदखान महाराजांचं मंदिर दिसतं. मंदिराला खेटूनच मशीदही आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात महंमद खान महाराजांची प्रसन्न मूर्ती आहे. महाराज गावातील विठ्ठल मंदिरासमोरच्या झाडाखाली बसत. त्याच ठिकाणी त्यांचं हे छोटेखानी मंदिर उभारलं गेलं आहे.
मंदिर आणि मशीद शेजारी
भातकुली तालुक्यातलं गणोरी गावाचं नाव पंचक्रोशीत सुपरिचित आहे ते, महंमदखान महाराज यांच्या नावानंच. डोमा नदीच्या तीरी वसलेल्या या गावात महंमदखान महाराज यांनी भारतीय संस्कृती आणि इस्लाम तत्त्वज्ञान यांचा सुरेख मेळ साधून धार्मिक सामंजस्य आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याचं कार्य केलं. महाराजांच्या मंदिरात प्रवेश करताच हिंदू-मुस्लिम असा भेद आपोआपच गळून पडतो. गावकऱ्यांमध्ये महंमदखान महाराजांबाबत प्रचंड श्रद्धा आहे. विशेष म्हणजे महाराज अजूनही आपल्यातच आहेत, अशी भावना प्रत्येकात आहे. प्रत्येक गावकऱ्याची पहाट महाराजांच्या चरणांना स्पर्श करून होते. हिंदू असो, मुस्लिम असो की अन्य कुणीही; तो महाराजांच्या मंदिरात जातोच. तिथं महाराजांच्या शांत, सौम्य मूर्तीसमोर ध्यानस्थ होतो. नतमस्तक होऊन मगच पुढील कामासाठी बाहेर पडतो.
महाराज ४०० वर्षांपूर्वी आले गावात
संतांचे मूळ आणि कूळ शोधू नये म्हणतात. महंमदखान महाराजही त्याला अपवाद नाहीत. ते मूळचे कोण, कुठले, कोठून आले, त्यांचे कूळ काय? हे कुणालाही माहिती नाही अन् ना कुण्या पुस्तकात ते लिहिलं गेलं. पण तरीही महाराज या गावाचे अविभाज्य अंग बनले. ४०० वर्षांपूर्वी इसवी सन १६०० मध्ये महंमदखान नावाचा एक मुस्लिम मनुष्य गणोरीत आला. हिंदूंचे दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणीची आराधना करीत तो गावातील विठ्ठल मंदिरात तासन् तास एकटाच बसायचा. मिळेल त्यानं पोटाची आग विझवायचा आणि परत विठुमाउलीच्या नामस्मरणात दंग व्हायचा.
महाराजांच्या नावे सामाजिक काम
महंमदखान महाराजांच्या कथा गावातील प्रत्येक घरात पाठ आहेत. केवळ भातकुलीच नव्हे, तर या परिसरातील अनेक गावांमध्ये महाराजांचा भक्तसंप्रदाय असून हिंदू-मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. गावात जे काही घडतं ते महाराजांच्याच कृपेमुळं अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. परमहंस महंमदखान महाराज संस्था महाराजांच्या मंदिराची देखभाल करते. संस्थानकडून सामाजिक कामंही केली जातात. मंदिराच्या शेजारीच एक हॉल बांधून दवाखान्यासाठी देण्यात आला आहे.
पंढरपूर वारीला जाते पालखी
परमहंस महंमदखान महाराजांनी सांगितलेला सर्वधर्म समभावाचा विचार पुढं नेण्यासाठी गावकऱ्यांनी पंढरपूरला वारीला महाराजांची पालखी नेण्यास सुरुवात केली आहे. गेली १७ वर्षे गणोरीतून महाराजांची पालखी पंढरीला जाते. दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पंधरवड्यात पालखी पंढरीकडं रवाना होते. पालखीसोबत शेकडो भक्तगण असतात. वाटेत ठिकठिकाणी पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था भक्तच करतात. पंढरपूरप्रमाणेच महाराजांची पालखी शेगावलाही जाते. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात शेगाव पालखी निघते. त्या पालखीमध्येसुद्धा शेकडो भक्त सहभागी होतात.
संस्थानचे अध्यक्ष अमर देशमुख, सचिव शशिकांत ठाकरे, मनोज इंगळे, संजय देशमुख, विकास देशमुख आणि अन्य कार्यकारिणी सदस्यांच्या प्रयत्नांमुळे महंमदखान महाराज मंदिराचं रूप आज पालटलं आहे. विकासाच्या नवीन संकल्पना आजच्या या नवीन पिढीनं तयार करून ठेवल्या आहेत. महाराजांच्या मंदिर स्थापनेची मूळ संकल्पना गणोरी इथं मुख्याध्यापक असलेल्या बाबाराव देशमुख यांची. त्यांच्यासह अन्य गावकऱ्यांनी घेतलेल्या पुढाकारातून महंमदखान महाराजांच्या मंदिराची पायाभरणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे महंमदखान महाराजांची आकर्षक मूर्ती जयपूर इथं साकारण्यात आली आहे. सागर देशमुख गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत आहेत.
गावात होत नाही निवडणूक
विशेष म्हणजे एरवी गावगाडा म्हटलं की राजकारण आलंच; मात्र गणोरी हे गाव त्यापासून कोसो दूर आहे. ग्रामपंचायतीपासून सोसायटीपर्यंत कुठल्याही प्रकारची निवडणूक होत नाही. झालीच तर अपवादानं एक-दोन जागांवर. गावकऱ्यांमधील परस्पर प्रेमाची भावना आणि सौहार्दता कायम आहे. गावात कुठलेही तंटे नाहीत. भांडणं झाली तरी आपसांत मिटतात. महंमदखान महाराजांच्या नावातच एक अशी जादू आहे की, तिथं मानवता जागृत होते.
अनंत चतुर्दशीला दिवाळी
महंमदखान महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव पंचक्रोशीत परिचित आहे. भाद्रपद महिन्यात अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून पुण्यतिथी महोत्सवाला सुरवात होते. हा महोत्सव म्हणजे गावासाठी जणू काही दिवाळीच. १० दिवस महाप्रसाद, रांगोळ्या, सडासारवण, मंदिरासोबतच घराघरांवर आकर्षक रोषणाई केली जाते. सहा महिन्यांपासून उत्सवाची तयारी सुरू होते. सासरी गेलेल्या मुली उत्सवाच्या काळात आपल्या माहेरी, गणोरीत येतात.
अखंड हरिनाम सप्ताहात दररोज महाप्रसाद असतो. विशेष असं की, मंदिराप्रमाणंच अनेकांच्या घरीसुद्धा या काळात महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. महोत्सवातील १० दिवस होणाऱ्या महाप्रसादाची भांडी स्वच्छ करण्याचं काम गावातील चव्हाण कुटुंबातील तिसरी पिढी आजही करते. महाराजांच्या रथाची देखभाल, तसेच डागडुजीची जबाबदारी इमानेइतबारे रामदास वानखडे आणि त्यांचे कुटुंबीय पार पाडत असतात. पूर्वजांपासून ही जबाबदारी त्यांच्याच कुटुंबाकडं आहे. महंमद खान महाराजांना गावकरी ‘माऊली’च मानतात. महाराजांची आपल्यावर सदैव कृपा असल्याची गावकऱ्यांची भावना आहे.