वारीतील सेवेला ५० वर्षे पूर्ण;
आळंदी संस्थानतर्फे सत्कार
फलटण : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला १८३२ पासून अश्व, तंबू आणि दररोजचा नैवेद्य अशी सेवा पुरविणारे श्रीमंत शितोळे सरकार यांचे वंशज श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या वारीतील सेवेला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याबद्दल श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि दिंडी समाजाचे वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, फेटा आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष योगेश देसाई आणि दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोसावी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
यावेळी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, ॲड. विठ्ठल महाराज वासकर, हैबतबाबांचे वंशज राजाभाऊ आरफळकर, सातारचे पोलिस अधीक्षक अजय बन्सल, सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, बाळासाहेब चोपदार, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर जळगावकर, हरिभाऊ बोराटे, पांडुरंग महाराज घुले, नामदेव महाराज वासकर, एकनाथ महाराज हांडे यांच्यासह दिंडी समाजाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी नीलेश महाराज कबीर यांनी प्रास्ताविक करुन शितोळे सरकार यांच्या कार्याचा गौरव केला.
सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील म्हणाले, वारकरी हे एक कुटुंब आहे. एखाद्याला अमर्याद अधिकार असताना ते मर्यादित स्वरुपात कसे वापरायचे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शितोळे सरकार आहेत. शितोळे सरकार हे वारकरी भूषण आहेत. श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार म्हणाले, सोहळा चालवत असताना सर्वांना सोबत घेऊन चालण्याची माझी भूमिका आहे . आपण माऊलीचे सेवक आहोत आणि विठ्ठलाचे भक्त आहोत. ही सेवा आणि भक्ती अशीच चालत राहावी, हीच माझी भावना आहे. आभार भाऊसाहेब फुरसुंगीकर यांनी मानले.
त्यापूर्वी शनिवारी पहाटे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची पूजा, अभिषेक आणि आरती पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. श्रीमंत शितोळे सरकारच्या वतीने माऊलींना नैवेद्य दाखविण्यात आला. दिवसभर दिंड्यांमधून टाळ मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष सुरू होता. संपूर्ण फलटण नगरी या गजराने दुमदुमून गेली होती. फलटण, बारामती तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील लाखो भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
फलटणमधील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर सोहळा उद्या (दि. ३ जुलै) बरड मुक्कामासाठी मार्गस्थ होईल.