संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आज

आजोळघरी; उद्या पहाटेच पुण्याकडे

आळंदी : माझे जिवीचे आवडी। पंढरपुरा नेईन गुढी।।
पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुणी वेधले।।
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या या त्यांच्या जीवाच्या आवडीप्रमाणे, ‘माऊली माऊली’ नामघोषात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीने आज (दि. २९) सायंकाळी सात वाजता पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवले.

यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे प्रस्थानासाठी उपस्थित राहिले. मात्र त्यामुळे प्रस्थान सोहळा सुमारे तीन तास लांबला. मंदिरात जाऊन मुख्यमंत्र्यांनी माऊलींचे दर्शन घेतले. संस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, प्रधान सचिव प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, गुरु हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार-आरफळकर, वासकर फडाचे ह. भ. प. राणा महाराज वासकर, आदी उपस्थित होते.

प्रस्थान सोहळ्यासाठी यावर्षी ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश दिला गेला. त्यामुळे प्रतिदिंडी ९० वारकरीच प्रस्थानासाठी मंदिरात येऊ शकले. आषाढी वारीसाठी माऊलींच्या पादुका सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ आणि सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्यांनी या पादुका वीणा मंडपात ठेवलेल्या पालखीत ठेवल्या.

मानकरी, फडकरी आणि दिंडीप्रमुखांना नारळप्रसाद देण्यात आला आणि सोहळ्याने आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. त्यानंतर वीणा मंडपातील माऊलींची पालखी खांद्यावर घेवून ‘माऊली माऊली’ नामाचा जयघोष करत आळंदीकरांनी पालखी वीणा मंडपातून बाहेर आणली. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर महाद्वारातून बाहेर पडत पालखीने नगरप्रदक्षिणा केली आणि नंतर पालखी माऊलींच्या आजोळघरी म्हणजे गांधीवाड्यात विसावली. सोहळ्याचा पहिला मुक्काम गांधीवाड्यात असून उद्या (दि. ३०) हा सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होईल.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात वारकरी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपयांचे अर्थसाह्य आदी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल वारकरी संत महंत पाईक संघटनेतील प्रमुख महाराजांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वारकरी संप्रदायातील मान्यवरांसोबत संवाद साधला. वारकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये लाभ देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महिलांच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

आळंदी नगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या तुळशी वृंदावन शिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, नगर परिषदचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आळंदी संस्थानचे पदाधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटनही करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया निःशुल्क असून गेल्या २ वर्षात २७५ कोटींची वैद्यकीय मदत गरजूंना देण्यात आली आहे. त्यामुळे ३५ हजार रुग्णांचे प्राण वाचले आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कोणत्या आजारांसाठी देण्यात येतो आणि निधी  मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहितीही यावेळी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *