त्र्यंबकेश्वरहून हजारो वारकऱ्यांच्या
उपस्थितीत झाले पालखीचे प्रस्थान
त्र्यंबकेश्वर : ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या गजरात, टाळ-मृदंगाच्या घोषात, हजारो वारकरी, भाविकांच्या उपस्थितीत आज (दि. २०) दुपारी तीनच्या सुमारास संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
पहाटे निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात पूजाविधी झाला. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते नारळ वाढवून पालखी रथाचे पूजन करण्यात आले. सनई, चौघडे आणि टाळ-मृदंगाच्या गजरात श्री निवृत्तीनाथांच्या पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखीची पंढरपूरकडे वाटचाल सुरू झाली. चांदीच्या रथामध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची मूर्ती आणि पादुका ठेवण्यात आल्या. रथाला पानाफुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रथाच्या समोरील बाजूस ‘विश्वगुरू’ आणि दुसऱ्या बाजूला ‘निवृत्तीराज’ असे लिहिण्यात आले होते.
रथाच्या पुढे संत निवृत्तिनाथ समाधी संस्थान, श्री देहूकर महाराज दिंडी, श्री बेलापूरकर महाराज दिंडी, श्री डावरे महाराज दिंडी यांच्या मानाच्या दिंड्या होत्या. तसेच रथाच्या मागील मानाच्या दिंड्याही शिस्तबद्धपणे सहभागी झाल्या होत्या. माजी नगराध्यक्ष सुनिल अडसरे, बाळासाहेब अडसरे, अजय अडसरे यांची बैलजोडी रथाला जोडण्यात आली आहे. तसेच सचिन शिखरे यांची बैलजोडी सनई पथकाच्या गाडीला जोडली आहे.
यावर्षी जवळपास ५० हजार वारकऱ्यांनी या प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावली. यंदाच्या वारी प्रस्थान सोहळ्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवर्जून हजेरी लावली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांचे आगमन झाले. त्यांनी संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. विश्वस्त मंडळाचा सत्कार स्वीकारत पालखी प्रस्थानाला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले.
पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी दुपारी दोनच्या सुमारास खासदार राजाभाऊ वाजे, ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे यांच्यासह जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष ह. भ. प. कांचन जगताप, सचिव अमर ठोंबरे, जीर्णोधार समन्वयक नीलेश गाढवे, पालखी सोहळा प्रमुख नारायण महाराज मुठाळ, प्रसिध्दीप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, सोमनाथ घोटेकर, माधव राठी, जयंत गोसावी, श्रीपाद कुलकर्णी, राहुल साळुंके यांसह सर्व विश्वस्त तसेच मानकरी बोलापूरकर महाराज, देहूकर महाराज, डावरे महाराज आदींच्या उपस्थितीत मानकरी, विणेकरी यांसह मान्यवरांचा नारळ, प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा सर्वात लांब पल्ल्यांच्या पालखीमध्ये समावेश होतो. याशिवाय संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे मोठे बंधू म्हणून निवृत्तीनाथ महाराज यांचे वारकरी संप्रदायामध्ये एक वेगळे स्थान आहे. त्यामुळे या वारीमध्ये सहभाग घेण्यासाठी संपूर्ण राज्यातून वारकरी येत असतात.
यंदा सरकारतर्फे निर्मलवारीसाठी सव्वादोन कोटी निधीला मंजुरी मिळाली आहे. हा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, फिरती प्रसाधनगृहे आणि दिंडी मार्गातील मुक्काम व्यवस्था यासाठी ही रक्कम खर्च करण्यात येणार आहे.
असा आहे पालखीचा प्रवास
निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर येथून निघून आज दोन किलोमीटरवरील श्री पंचायत महानिर्वाण आखाडा पेगलवाडी येथे मुक्कामी असणार आहे. या ठिकाणी त्र्यंबकेश्वरचे भाविक आणि मंडळे पालखीची भोजन व्यवस्था करतील. शुक्रवारी (दि. २१) सकाळी सात वाजता स्नान, पूजा झाल्यानंतर पालखी महिरावणी येथे दुपारी जेवणासाठी थांबेल.
सायंकाळी सातपूर येथे मुक्कामी थांबेल. त्यानंतर पिंपळगाव बसवंत येथील भाविक रात्रीचे जेवण देतील. शनिवारी (दि.२२) नाशिक शहरात पालखी सकाळी नऊला प्रवेश केल्यावर त्र्यंबक रोडवरील पंचायत समिती कार्यालयासमोर नाशिककर पालखीचे स्वागत करतील. दुपारी बारा वाजता काजीपुरा नामदेव विठ्ठल मंदिरात आणि तेथून गणेशवाडी, नवीन भाजी मार्केट येथे मुक्कामी थांबेल.
तसेच रविवारी (दि. २३) सकाळी ११ वाजता नाशिक रोड येथून सायंकाळी पळसे येथे मुक्कामी पोहचेल. तेथून खंबाळे, पारेगाव, गोगलगाय, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगराळ आणि अहमदनगर येथे तीन जुलै रोजी श्री निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा सकाळी १० ते १२ पर्यंत होईल.
तेथून मुक्कामी साकत, घोगरगाव, मिरजगाव, कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंबर, दगडी अकोले, करकंब, पांढरीचीवाडी, चिंचोली आणि पंढरपूर असा प्रवास असेल. या दरम्यान २५ जून रोजी सिन्नरलगतच्या दातली येथे आणि १६ जुलैला वाखरी येथे रिंगण सोहळा होईल. यानंतर १७ ते २० जुलैला पंढरपूरला पालखीचा मुक्काम असणार आहे.