सामाजिक चळवळींशी जोडले
गेलेले नित्यानंद मोहिते महाराज
वारकरी संप्रदायीक केवळ वारी, भजनपूजन याच बाबींशी संबंधित असतात. समाजातील अन्य घडामोडींपासून ते दूर राहतात, हा अनेकांचा समज अकोल्यातील नित्यानंद मोहिते महाराज यांनी आपल्या कार्याने खोडून काढला. अनेक सामाजिक चळवळीत भाग घेऊन त्यांनी जनप्रबोधनाचा वारकरी वसा जपला.
नित्यानंद उर्फ नारायण मोहिते महाराज यांचा जन्म २ फेब्रुवारी १९०७ रोजी दक्षिण महाराष्ट्रातील एका गावात झाला. हे गाव कोणते याची नोंद मात्र सध्या उपलब्ध नाही. कुटुंबियांसह राहत असताना नित्यानंद मोहिते महाराज हे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीशी जोडले गेले. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारात ते भूमिगत राहिले. याच काळात ते अकोला येथे आल्याची नोंद आहे. पुढे कीर्तन, प्रवचन, भागवत सप्ताह आदी माध्यमांतून त्यांनी समाज जागृती केली. अंधश्रद्धा, जातीय निर्मूलन, यासह शिक्षणाचा प्रसार केला. गावोगावी जाऊन दारूबंदीसाठी प्रयत्न केले अनेकांचे विवाह जुळवले. इतकेच नाही, तर अनेक घटस्फोट देखील थांबवले.
यशवंतराव चव्हाण, महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी नारायरावांचे ऋणानुबंध होते. साधारणपणे वयाच्या २७ व्या वर्षी एका जमीनदाराने त्यांना फसवले आणि त्या अन्यायाने व्यथित झालेले नारायणराव मोहिते अकोल्याहून थेट आळंदी येथे माउलींच्या सानिध्यात आले. तेथून त्यांनी हिमालयाची वाट धरली. तेथे एका सिद्धपुरुषामुळे त्यांना साक्षात्कार झाला आणि तेथून ते अकोल्याला परत आले. तिथून पुढे ‘नित्यानंद महाराज’ अशीच त्यांची ओळख झाली. (हिमालयात त्या सिद्धपुरूषानेच त्यांना हे नाव दिले.)
नित्यानंद महाराज हे वैद्यदेखील होते. आयुर्वेदिक औषधांनी त्यांनी अनेकांचे दुर्धर आजार बरे केले. महत्वाचे म्हणजे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याशी नित्यानंद महाराज यांचा स्नेह अखेरच्या काळापर्यंत कायम राहिला. उमेदीच्या काळात महाराजांनी अनेकदा पंढरीची वारी केली. त्यांच्यासोबत अनेक साधक पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला जात असत. पुण्याच्या लष्करी छावणीत त्यांचे कीर्तन होत असे.
त्यांनी ‘मनोबोध’ ही पुस्तिका रचली. ‘आई आणि बाळाचे असते अगदी तसेच नाते गुरू आणि शिष्याचे असते’ अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. मनोबोध, उपासना, श्रीकृष्णवरील काव्य, विठ्ठलाची आरती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची आरतीदेखील त्यांनी रचली.
नित्यानंद महाराजांनी १९ जानेवारी १९८५ रोजी आपली इहलोकीची यात्रा थांबवली. अकोल्याच्या जठार पेठ भागात त्यांचे मंदिर आणि समाधी स्थळ आहे. तेथे गुरूपौर्णिमेला मोठा उत्सव असतो. शिवाय अमरावती जिल्ह्यातील दहिगाव रेचे येथे दरवर्षी वसंत पंचमीला भंडारा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन नित्यानंद मोहिते महाराजांचे भक्त करत असतात. ‘फक्त विठ्ठलाचा भक्त, कीर्तनकार इतकेच नाही तर समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक असे विपुल कार्य नित्यानंद मोहिते महाराज यांचे राहिले आहे,’ असे त्यांच्या कन्या तथा कीर्तनकार प्रभाताई बाळसराफ यांनी सांगितले.